बातम्या

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Admission process for Modi Script Certificate Course


By nisha patil - 9/9/2025 4:41:06 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया दिनांक २५ ऑगस्ट २०२५ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे.

शिवपूर्व काळापासून स्वातंत्र्य काळापर्यंत मराठी प्रशासनात तसेच दैनंदिन कामकाजात मोडी लिपीचा प्रमुख वापर होत असे. त्या काळातील शेतजमिनींच्या नोंदी, जन्म-मृत्यू दाखले, खरेदी पत्रे, न्यायालयीन दावे यांसह बहुतेक कागदपत्रे मोडी लिपीतच लिहिलेली आहेत. त्यामुळे या लिपीचे ज्ञान नसताना त्या काळाचा अभ्यास व संशोधन करणे अशक्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

मोडी लिपीचे ज्ञान प्राप्त करून विद्यार्थी संशोधन क्षेत्रात नवी दारे उघडू शकतात तसेच सामाजिक शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. कागदपत्रांचे लिप्यंतर करून सामाजिक योगदानासोबत उपजीविकेची साधनाही मिळू शकते.

“शिवपूर्व काळापासून इंग्रजी सत्तेच्या कालखंडातील महाराष्ट्राच्या इतिहासावर संशोधन करायचे असल्यास मोडी लिपीचे ज्ञान अपरिहार्य आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक व इतिहासप्रेमींनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले.


शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
Total Views: 177