बातम्या
*नटसम्राट नंतर आता एक वेगळा बंधू चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडणार*
By nisha patil - 3/11/2026 11:37:02 PM
Share This News:
*नटसम्राट नंतर आता एक वेगळा बंधू चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडणार*
*आजरा (हसन तकीलदार):- ‘नटसम्राट’नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे एक वेगळ्या धाटणीचा, दमदार आणि भावनांचा ठाव घेणारा चित्रपट म्हणजे ‘बंधू’! गवळदे परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनाचा ठोका चुकवणारा हा चित्रपट ठरणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
या चित्रपटाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी ही दमदार जोडी पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे सादरकर्ते रजद बेदी असून, बॉलिवूडमधील या सुपरस्टारने मराठी चित्रपटासाठी दाखवलेली आस्था आणि पुढाकार ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
मराठी चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव आणि मराठी चित्रपटांचे बदलते स्वरूप याची प्रचिती या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा येणार आहे. केवळ दमदार अभिनय आणि कथानकच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ‘बंधू’ चित्रपटाने वेगळी उंची गाठली आहे. या चित्रपटाचे व्हि एफ एक्स आणि एडिटिंगचे काम आजऱ्यातच करण्यात आले आहे. त्यामुळे आजऱ्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
या चित्रपटाचे VFX दिग्दर्शक म्हणजेच सुलगावचे सुपुत्र उन्मेष देसाई यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर आजऱ्याचे नाव चित्रपटसृष्टीत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आजरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेत आपली कलात्मक क्षमता सिद्ध केली आहे. उन्मेष देसाई, विकी रॉड्रिग्ज आणि किशोर देसाई यांनी आजऱ्यात सुरू केलेल्या या स्टुडिओचे आणि त्यांच्या जिद्दीचे विशेष कौतुक करावे तेवढे थोडेच!
स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कलागुणांना आणि तांत्रिक कौशल्याला योग्य संधी मिळाली, तर जागतिक दर्जाची कामगिरी करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘बंधू’ चित्रपट होय. आजऱ्यातील तरुणांच्या हातून एका मोठ्या चित्रपटाचे तांत्रिक काम पूर्ण होणे ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्सुकतेने प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जाणारा असून, मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करेल, असा विश्वास उन्मेष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रवासात प्रा. रमेश चव्हाण यांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे. त्यांनी नेहमीच या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिले, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. तब्बल १५ वर्षांच्या मेहनतीनंतर आज त्यांच्या प्रयत्नांना यशाचे सुंदर फळ मिळताना दिसत आहे. एका विद्यार्थ्याच्या स्वप्नाला दिशा देऊन त्याला मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचवणारे प्रा. रमेश चव्हाण यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
‘बंधू’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर आजऱ्यातील मातीतील कलागुण, तरुणांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मराठी माणसाच्या स्वप्नांची भरारी आहे!
काही चित्रपट मनोरंजन करतात, काही विचार करायला लावतात; पण काही चित्रपट मनाचा ठाव घेतात आणि डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात. ‘बंधू’ असाच काहीसा अनुभव देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा चित्रपट पाहताना अश्रू अनावर होणार नाहीत, याची मात्र खात्री देता येणार नाही!
आजऱ्याच्या मातीचा अभिमान, मराठी चित्रपटसृष्टीचा नवा आविष्कार आणि स्थानिक तरुणांच्या कर्तृत्वाची झेप म्हणजे ‘बंधू’!
*नटसम्राट नंतर आता एक वेगळा बंधू चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडणार*
|