खेळ
विश्वकरंडक विजयानंतर डी. वाय. पाटीलवर पुन्हा क्रिकेटचा जल्लोष, WPL ला उद्यापासून सुरुवात
By nisha patil - 9/1/2026 12:10:19 PM
Share This News:
काही महिन्यांपूर्वी भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून इतिहास घडवला आणि त्यानंतर झालेला जल्लोष आजही क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत ताजा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्यापासून महिला प्रीमियर लीग (WPL) चा चौथा हंगाम सुरू होत आहे. पहिल्याच सामन्यात भारताच्या दोन दिग्गज खेळाडू हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना आमनेसामने येणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
महिला प्रीमियर लीगचे हे चौथे पर्व असून आतापर्यंत मुंबई इंडियन्सने दोनदा विजेतेपद पटकावले आहे, तर एकदा बंगळूर संघाने करंडकावर नाव कोरले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियम आता भारतीय महिला क्रिकेटचे माहेरघर मानले जात असून, येथे होणाऱ्या पहिल्या टप्प्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
गतविजेते मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही तितकाच मजबूत मानला जात आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची नॅट स्किवर-ब्रंट, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज, न्यूझीलंडची अमेलिया केर आणि ऑस्ट्रेलियाची मिली इलिंगवर्थ असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संघात आहेत. भारतीय संघाचे भवितव्य म्हणून पाहिली जाणारी अमनज्योत कौर आणि नवोदित जी. कमलिनीही मुंबईची ताकद वाढवत आहेत. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शबनीम इस्माईल आणि सैका इशाक यांच्यावर असेल
उद्याच्या सामन्यात मुंबईसमोर बंगळूरचा संघ उभा ठाकणार आहे. या संघाची संपूर्ण मदार कर्णधार स्मृती मानधनावर असेल. मधल्या फळीत रिचा घोषसारखी आक्रमक फलंदाज असून, गोलंदाजी विभागात अरुंधती रेड्डी आणि पूजा वस्त्रकर महत्त्वाची भूमिका बजावतील. दक्षिण आफ्रिकेची आष्टपैलू नादिन डी क्लर्कही संघासाठी उपयुक्त ठरणार आहे.
दिल्ली संघातही मोठे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लेनिंग आता यूपी वॉरियर्सकडून खेळणार असून, दिल्लीचे नेतृत्व जेमिमा रॉड्रिग्जकडे सोपवण्यात आले आहे. शेफाली वर्मा, स्नेह राणा, श्री चरणी यांसारख्या खेळाडूंमुळे दिल्लीचा संघ धोकादायक मानला जातो. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लौरा वूल्फार्टही दिल्लीकडून आपली छाप पाडण्यास उत्सुक आहे.
गुजरात जायंट्सने यंदा नव्याने संघबांधणी केली असून अॅश्ले गार्डनच्या नेतृत्वाखाली तेही स्पर्धेत आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. रेणुका सिंग ठाकूर, यास्तिका भाटिया, तितास साधू यांसारखे खेळाडू त्यांच्या संघाची ताकद आहेत.
एकूणच, विश्वकरंडक विजयानंतर महिला क्रिकेटला मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत, महिला प्रीमियर लीगचा हा हंगाम रंगतदार आणि चुरशीचा होणार, यात शंका नाही.
विश्वकरंडक विजयानंतर डी. वाय. पाटीलवर पुन्हा क्रिकेटचा जल्लोष, WPL ला उद्यापासून सुरुवात
|