बातम्या
🕯️ कोल्हापूरात अघोरी विधी आणि करणीचे सत्र वाढले; स्मशानभूमीत रात्रीच्या काळोखात सुरू काळे प्रयोग!
By nisha patil - 11/13/2025 1:06:13 PM
Share This News:
कोल्हापूर : पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात अलीकडे भोंदू बाबा आणि मांत्रिकांच्या अघोरी विधींचा कहर वाढताना दिसतो आहे. स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी ‘अघोरी पूजा’, भूत-बाधा दूर करण्याचे नावाखाली काळे प्रयोग, तसेच नागरिकांवर करणीचे प्रकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘कोल्हापूर अघोरी पूजा आणि ब्लॅक मॅजिक’ या नावाने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मांत्रिकांकडून लहान मुलांवर, महिलांवर आणि निरपराध नागरिकांवर जादूटोणा आणि करणीचे प्रयोग होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटनांकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धाजन्य घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्यासाठी त्यांच्या फोटोंमध्ये खिळे मारणे, लिंबू कापणे अशा करणीच्या पद्धती वापरत असल्याची चर्चा आहे.
शिरोळी पुलाची परिसरातील स्मशानभूमीत झालेल्या कथित अघोरी पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी हातात कंदील आणि मातीचे दिवे घेऊन काही व्यक्ती मंत्रोच्चार करत असल्याचे दृश्य व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारामुळे ‘कोल्हापूरमध्ये अघोरी तांत्रिकांचे सत्र वाढते आहे का?’ असा सवाल उपस्थित झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तत्काळ अशा भोंदू बाबा आणि मांत्रिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा अंधश्रद्धा आणि भीतीचे वातावरण वाढून सामान्य लोकांची फसवणूक होत राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
🕯️ कोल्हापूरात अघोरी विधी आणि करणीचे सत्र वाढले; स्मशानभूमीत रात्रीच्या काळोखात सुरू काळे प्रयोग!
|