ताज्या बातम्या
कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे
By nisha patil - 2/1/2026 1:18:47 PM
Share This News:
मुंबई, दि. 1 : जागतिक हवामान बदलाचे गंभीर संकट लक्षात घेता राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे शास्त्रीय पद्धतीने संस्कार करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल अशी बियाणे विकसित करावीत, तसेच राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती घडवून आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले.
लोकभवन, मुंबई येथून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.
या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरू, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, संकरीत बियाणे शेतकऱ्यांसाठी महाग असून त्यावर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, अन्नधान्याची चव कमी होते आणि पोषणमूल्यही घटते. यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांवर सखोल संशोधन करून त्यांचे उन्नतीकरण करणे आवश्यक आहे.
नैसर्गिक शेतीच्या प्रचार व प्रसारासाठी सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी ‘मॉडेल फार्म’ विकसित करावेत व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. नैसर्गिक शेती ही केवळ शेतीपद्धत नसून ती लोकचळवळ झाली पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
नैसर्गिक शेती हे भावी पिढ्यांच्या अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि ईश्वरी कार्य आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. अनेक शेतकरी दुकानदारांच्या सल्ल्यानुसार युरिया, डीएपी व कीटकनाशकांचा अतिवापर करतात, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
गुजरातमधील चार कृषी विद्यापीठे गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक शेतीवर संशोधन करीत असून, महाराष्ट्रातील विद्यापीठांनी नव्याने संशोधन सुरू करण्याऐवजी गुजरातमधील संशोधन पुढे न्यावे. त्यासाठी आवश्यक संशोधन अहवाल, पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही राज्यपालांनी सांगितले.
अलीकडे गावागावांत जाऊन नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करताना आणंद जिल्ह्यातील २५ गावांमध्ये भूमिगत पाण्यात नायट्रेट आढळून आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याकडे केवळ एक देशी गाय असली तरी नैसर्गिक शेती शक्य आहे, हा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर यांसारख्या देशी गायींचे संवर्धन झाल्यास शेतीस मोठा आधार मिळेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असेही राज्यपालांनी नमूद केले.
महाराष्ट्रात नैसर्गिक शेती विषयावर घेतलेल्या दोन परिसंवादांनंतर कृषी विभाग व विद्यापीठांनी सकारात्मक पावले उचलल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर यांनी सादरीकरण केले.
कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे
|