बातम्या

आजरा तालुका व पंचक्रोशीतील ग्रामीण भागासाठी मुक्कामी एस.टी. बसफेऱ्या सुरू करा-आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाची मागणी

Ajara City Unified Merchants


By nisha patil - 9/10/2026 7:41:39 PM
Share This News:



आजरा तालुका व पंचक्रोशीतील ग्रामीण भागासाठी मुक्कामी एस.टी. बसफेऱ्या सुरू करा-आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाची मागणी
 

*आजरा(हसन तकीलदार):- आजरा शहर हे आजरा तालुका तसेच आजरा तालुक्याच्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामकाज, आरोग्यविषयक सेवा, शैक्षणिक कामे, शिक्षण तसेच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शेतीविषयक साहित्याची खरेदी-विक्री आणि इतर विविध कारणांसाठी आजरा शहरात नियमितपणे यावे लागते. आजरा शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांचे ग्राहक हे आजरा तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यावसायिक व नागरिक आहेत. त्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना आजरा शहराशी जोडणारी एस.टी. बससेवा ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची असल्याने ग्रामीण भागासाठी मुक्कामी बस सेवा सुरु करण्याची मागणी आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाने निवेदनाद्वारे आजरा आगार प्रमुख यांचेकडे केली आहे.
                                                 

निवेदनात म्हटले आहे की,
आजरा आगारामार्फत विविध मार्गांवर एस.टी. बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र, अनेक ग्रामीण भागांमध्ये मुक्कामी बसफेऱ्या उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना सकाळी लवकर आजरा येथे येणे अथवा सायंकाळी आपल्या गावाकडे परत जाणे यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः शेतकरी वर्गाला बाजारपेठेतील कामे, शेतीमालाची विक्री, खरेदी तसेच शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी वेळेवर वाहतूक उपलब्ध होत नाही.

त्याचप्रमाणे या गावांसह लगतच्या वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांचा आजरा शहराशी मोठ्या प्रमाणावर दैनंदिन संबंध आहे. या भागातील अनेक नागरिक हे शेतकरी असून त्यांना शेतीमाल, खते, बियाणे, औषधे, शेतीसाहित्य तसेच घरगुती जीवनावश्यक वस्तूंसाठी आजरा शहरावर अवलंबून राहावे लागते.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नागरिकांना आरोग्यसेवेसाठी, महिलांना बाजारपेठ व इतर आवश्यक कामांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासकीय व वैद्यकीय कामांसाठी आजरा शहरात येणे आवश्यक असते. मात्र, मुक्कामी एस.टी. बसफेऱ्या नसल्यामुळे अनेक नागरिकांना खासगी वाहनांचा किंवा इतर महागड्या वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक व शेतकरी वर्गासाठी हा अतिरिक्त आर्थिक भार ठरत आहे.

त्यामुळे आजरा शहरातील व्यापारी वर्गाच्या वतीने तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीचा विचार करून आजरा शहराशी जोडलेल्या ग्रामीण भागातील आवश्यक मार्गांवर मुक्कामी एस.टी. बसफेऱ्या तातडीने सुरू करण्यात याव्यात.सकाळच्या वेळेत ग्रामीण भागातून आजरा शहरात येण्यासाठी आणि सायंकाळी आजरा शहरातून संबंधित गावांकडे परत जाण्यासाठी योग्य वेळापत्रक तयार करण्यात यावे.सध्या बंद असलेल्या किंवा पूर्वी सुरू असलेल्या मुक्कामी बसफेऱ्यांचा आढावा घेऊन त्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात.शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार व व्यापारी वर्गाच्या सोयीचा विचार करून बसफेऱ्यांच्या वेळा निश्चित करण्यात याव्यात.ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्या मार्गावर प्रवासी मागणीचा सर्वेक्षण करून अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात.आजरा शहर ही पंचक्रोशीची प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी एस.टी. वाहतूक अधिक सक्षम करण्यात यावी.

ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित गावांच्या ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून मुक्कामी बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या गरजा लक्षात घेऊन आजरा आगाराने या मागणीचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करावा.अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर महेश नार्वेकर (अध्यक्ष), वाय. जी. इंजल(उपाध्यक्ष), सचिन इंदलकर(सचिव), श्रीपाद कुलकर्णी, राजेश विभुते, तौफिक आगा, संजय हरेर, वृषाल हुक्केरी, बाळासाहेब पाचवडेकर आदींच्या सह्या आहेत.


आजरा तालुका व पंचक्रोशीतील ग्रामीण भागासाठी मुक्कामी एस.टी. बसफेऱ्या सुरू करा-आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाची मागणी
Total Views: 61