बातम्या

*आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Ajara Sugar Factorys 36th Annual General Meeting Concluded


By nisha patil - 1/10/2026 2:47:37 PM
Share This News:



*आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

*दिवाळीला गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन 100रु. जादाचा फरक देणार -अध्यक्ष मुकुंद देसाई

*आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. उपाध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत केले. संचालक रणजित देसाई यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक संभाजी पाटील यांनी नोटीस वाचन केले. तर अधीक्षक अनिल देसाई यांनी मागील सभेचे इतिवृत्तांत वाचले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले.
       

प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन मुकुंद देसाई म्हणाले की, कारखाना अडचणीत असताना कामगारांनी मोठे योगदान दिले आहे. 50 टक्के पगारावर काम करून संस्था टिकवायचे काम केले आहे. कामगारांप्रमाणेच सभासदांनीही त्याग दिल्यामुळे बंद असलेले कारखान्याचे चाक सुरु झाले. एन. सी. डी. सी. चे कर्ज मिळवून द्यायला कै. अजितदादा पवार आणि नाम. हसन मुश्रीफ यांचे योगदान मोठे आहे. 122कोटीचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. त्यामुळे भविष्यात चांगल्या प्रकारे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. कारखान्याला दरमहा 88 लाख व्याज भरावे लागते ते वेळेत आणि मुदतीत भरले जात आहे.

अहवाल सालात 2 कोटीहुन अधिकची बचत केली आहे. साखरेचे दर वाढले तरी याचा लाभ कारखान्यांना मिळालेला नाही. आता पुन्हा साखरेचे दर कमी झाले आहेत.साखरेचे दर वाढले तेव्हा कोटा मिळाला नाही त्यामुळे कारखान्याला साखर दर वाढीचा फायदा झाला नाही. कामगारांना पुढच्या दोन वर्षात टप्प्याटप्प्याने 100 टक्के पगार करणार आहे. बोनस देता येत नव्हते तरीसुद्धा दिवाळीला 8•33 बोनस देण्यात येणार आहे. जुनी मशनरी असल्याने त्यात आता काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याने नवीन बदल करण्याचे धोरण सुरु आहे. कर्मचारी, सभासद यांच्याबरोबरच संचालकांचीही साथ मोलाची ठरली आहे.

ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करणेत आले आहे. त्याचप्रमाणे शेतीविभागाने ऊसतोडणीचे 7 ते 8 मशीन उपलब्ध केल्या आहेत. गाळप हंगाम 2026/27 मध्ये 4 लाखाहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाच गटातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांचा यावेळी रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

राजकारण बाजूला ठेऊन तालुक्याचे वैभव टिकवायचे आहे ही भावना मनात ठेऊन कारखान्याला सहकार्य करा. पाच वर्षे ऊसविकांसाकडे दुर्लक्ष झाले. आता विविध तांत्रिक योजना राबवून ए. आय. च्या तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग उत्तूर सेंटरला व्ही. एस. आय. पुणे यांच्या माध्यमातून सुरु आहे. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केला आहे. याअगोदर एफ. आर. पी. पेक्षा जास्त 3400₹ ऊस दर दिला आहे. तरीसुद्धा आता पुन्हा 100₹ चा अधिकचा हफ्ता दिवाळीला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी या दिवाळीपूर्वी देण्यात येतील व कर्मऱ्यांची थकीत देणी टप्प्याटप्प्याने दिले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 

  माजी चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले की,ओव्हरहोलिंगसाठी जादा खर्च करूनही गाळप कमी होत असल्याचे निदर्शनास आणले. गाळप कमी झाले तर कारखान्याला फटका बसणार त्यामुळे अनावश्यक खर्च टाळले पाहिजे अशी सूचना मांडत आपल्या कालावधीत फक्त 4 कोटीत ओव्हरहोलिंगची कामे करून साडेतीन लाखाच्या वर गाळप केले होते असे निदर्शनास आणून दिले.
       

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाअध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले की, 15 ऑक्टोबरला कारखाना सुरु केला तर कारखाना आणि शेतकऱ्यांचाही तोटा होणार आहे. रिकव्हरी कमी लागली तर कारखान्याला अंदाजे 10 ते 12 कोटींचा तोटा सहन करावा लागणार.
 

सुनील शिंदे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी वेळेत देण्याबाबत तर स्वाभिमानीचे उपाध्यक्ष संजय देसाई यांनी ऊस बिले वेळेत देण्याची सूचना मांडली. याबरोबरच इंद्रजित देसाई, कॉ. शांताराम पाटील, सचिन पावले, तुळसाप्पा पोवार यांनीही व्यवस्थापनाबाबत सूचना मांडल्या.संचालक राजेंद्र मुरुकटे यांनी आभार मानले.
   

यावेळी जिल्हाबँक संचालक सुधीर देसाई, संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयराज पोवार,सुभाष देसाई, मधुकर देसाई, संभाजी पाटील, मारुती घोरपडे, शिवाजी नांदवडेकर, अशोक तर्डेकर, राजेश जोशीलकर, हरिभाऊ कांबळे, गोविंद पाटील, नामदेव नार्वेकर, दिगंबर देसाई, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, माजी संचालक जनार्दन टोपले, राजेंद्र सावंत, जिल्हापरिषद सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, राजू होलम, महादेव हेब्बाळकर, विक्रमसिंह देसाई यांच्या बरोबरच शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


*आजरा साखर कारखान्याची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
Total Views: 20