बातम्या

आजरा तालुक्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी

Ajra 2 date


By nisha patil - 6/28/2026 10:17:39 PM
Share This News:



**आजरा तालुक्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी*

आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण दुचाकी अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . या सलग अपघातांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.एक चूक परंतु दोन्ही कुटुंबाना वाऱ्यावर सोडते.

त्यामुळे आपण आपल्या सुरक्षेची भावना ध्यानात घेऊन सावधगिरीने आणि मर्यादित वेगात आपले वाहन सुरक्षित चालवणे गरजेचे आहे. मद्यपान करून, मोबाईल वर बोलत, अतिवेगाने वाहन चालवणे टाळले पाहिजे.

          पहिली घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भादवणवाडी येथे घडली. येथील सचिन आनंदा कांबळे (वाडेकर) (वय वर्षे ३६) हे गावातील रस्त्यात दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. यात ते रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले परंतु उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

 

दुसरी घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर याच आजरा - गडहिंग्लज मार्गावरील आजरा वन विभागाचे कार्यालय ते म्हसोबा देवस्थान परिसरात दुचाकी वाल्याना अज्ञात चार चाकी वाहनाने धडक देऊन पसार झाल्याने एक जण जखमी तर एक ठार झाला . विलास गंगाराम पेडणेकर (वय २८, रा. गवसे) आणि ज्ञानदेव लक्ष्मण भांदुर्गे (रा. आल्याचीवाडी) हे दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विलास पेडणेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्ञानदेव भांदुर्गे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी भांदुर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप वाहन चालकविरोधात पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे.मध्यरात्री घडलेल्या या अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी दुचाकीचे झालेले मोठे नुकसान पाहता भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.

या दोन्ही घटनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


आजरा तालुक्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी
Total Views: 416