शैक्षणिक
आजरा महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजने'च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सोहाळे येथे उद्घाटन
By Administrator - 10/1/2026 11:23:09 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार ):-जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) विभागाच्या वतीने मौजे सोहाळे (ता. आजरा) येथे सात दिवसीय 'विशेष श्रमसंस्कार शिबिराचे' उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ‘जलसंधारण व शास्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग’ हा मंत्र घेऊन दि. ८ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे असून श्रमसंस्कारातूनच उद्याचा जबाबदार नागरिक घडतो, असे प्रतिपादन केले. युवा शक्तीचा वापर विधायक कामांसाठी केल्यास समाजामध्ये शाश्वत विकास घडून येईल. या सात दिवशीय शिबिरामध्ये पशुचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिर, पाणवठा स्वच्छता, ग्रामस्वच्छता याबरोबरच काजू पिक लागवड तंत्रज्ञान, जल जंगल आणि जमीन, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे या विषयांवर व्याख्यान तसेच महिला आरोग्य आणि सबलीकरण, मताधिकार जनजागृती अभियान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सोहाळे गावच्या सरपंच सौ. भारती डेळेकर यांनी शिबिरासाठी ग्रामपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
मौजे सोहाळे येथे ‘श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे शाल, पुष्प व गावातील नागरिक मारुती डेळेकर लिखित ‘बंध’ या कथासंग्रह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थचे संचालक डॉ. दिपक सातोसकर, श्री. के. व्ही. येसणे तसेच उपसरपंच वसंत कोंडुसकर, पोलीस पाटील माया कोंडूसकर (सोहाळे), मधुकर डेळेकर (बाची), ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखा कांबळे, रमा कांबळे, श्री. महादेव पाटील, श्री. संदीप देसाई उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ आणि कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी केले. सूत्रसंचालन ज्युनिअर विभागाचे प्रकल्पाधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती वैशाली देसाई यांनी मानले. या उद्घाटन कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजरा महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजने'च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सोहाळे येथे उद्घाटन
|