ताज्या बातम्या
सुविधाच नाही देताय तर...कशाला घेताय कर.. आजरा अन्याय निवारण समिती
By nisha patil - 9/17/2025 10:47:36 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्याचे लौकिक, श्रद्धास्थान आणि श्रीप्रभूरामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेले रामतीर्थ हे आजरा तालुक्याचे वैभव आहे.
निसर्गाच्या मनोहर, लोभनीय दृश्यासोबत आस्थेचे केंद्र असलेल्या त्याचबरोबर फेसाळत पर्यटकांना साद घालणारा रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक आजपर्यंत येत आहेत. परंतु रामतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाकडून आकारण्यात येणारे कर पर्यटकांना एक प्रकारची डोके दुखी ठरलीय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कर आकारणीच्या पद्धतीवर अन्याय निवारण समितीने वारंवार आवाज उठवला आहे.
गेल्यावर्षीच याबाबत चर्चा होऊन स्थानिक लोकांना यातून सूट देण्यात आली होती. परंतु परत काही तक्रारी आल्या नंतर अन्याय निवारण समितीने याठिकाणी जाऊन खात्री करण्याचा प्रयत्न केला व वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर तालुक्यातील स्थानिक चार चाकी आणि दोन चाकी वाहनांना कोणतेही कर घेतले जाणार नाही तसेच पुढील बैठक होईपर्यंत आजरा तालुका व्यतिरिक्त बाहेरच्या फक्त चार चाकी वाहनांना शुल्क आकारले जाईल असे रेंज फॉरेस्ट अधिकारी यांनी सांगितले असल्याचे अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी)यांनी सांगितले.
रामतीर्थ पर्यटन नाक्यावर झालेल्या चर्चेत अनेक त्रुटी वनविभाग अधिकाऱ्यांच्या समोर मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने पर्यटन कर आकारला जातो परंतु पर्यटकांच्या सोयीसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, प्रसाधन गृहे स्वच्छ नाहीत, वसूल केलेल्या कराची पावती अधिकृत शिक्का व सहीशिवाय देण्यात येते त्यामुळे व्यवहारांबाबत शंका निर्माण होते प्रसंगी वादावादीचे प्रसंग उद्भवतात, स्थानिक पर्यटकांना या अन्याकारी करातून सूट दिलेली आहे ती कायम रहावी आणि बाहेरच्या पर्यटकाकडून फक्त चारचाकीसाठी कर वसुली करणेत यावी व टू व्हीलरसाठी कर आकारणी करणेत येऊ नये.त्याचबरोबर गोळा केलेल्या कराचा विनियोग कशा पद्धतीने केला जातो हे दाखवण्यात यावे व कारभार पारदर्शी असावा असेही मत मांडण्यात आले.
एकंदरीत कित्येक वर्षापासून विनामूल्य रामतीर्थ परिसरात दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना आत्ताच या कराचा फंडा कोणी व का सुरु केला हा ही एक संशोधनाचा भाग ठरणार आहे असे काही भक्तांचे म्हणणे आहे.
यावेळी अन्यायनिवारण समितीचे अध्यक्ष पशुराम बामणे (भाऊजी ), उपाध्यक्ष गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण,जावेद पठाण, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, मिलिन डिसोझा तसेच वनविभागचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुविधाच नाही देताय तर...कशाला घेताय कर.. आजरा अन्याय निवारण समिती
|