विशेष बातम्या
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती ऍक्टिव्ह मोडवर
By nisha patil - 8/12/2025 3:15:05 PM
Share This News:
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती ऍक्टिव्ह मोडवर
आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा–पोळगाव रस्त्यावरील अयोग्य ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याचा प्रकार अन्याय निवारण समितीची तातडीच्या कारवाईची मागणी करीत शहरातील अनेक भागात त्रूट्या दिसून येत आहेत त्यावरही योग्य उपायोजना करीत समस्यांचे निराकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे अन्याय निवारण समितीने केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,अमृत जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आजरा शहरात सुरू असलेल्या पाईपलाइन बसविणे व चाचणीसंदर्भातील कामांमध्ये गंभीर त्रुट्या तसेच अनियमितता आढळत आहे. आजरा–पोळगाव मुख्य रस्त्यावर एकता कॉलनीसमोरील चढाव व तीव्र वळण असलेल्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम हे पूर्णपणे अयोग्य व चुकीचे आहे.
समितीने स्पष्ट केले आहे की, पेट्रोल पंपानंतरच्या चढावातूनच एकता कॉलनीकडे तीव्र वळण जात असल्याने त्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे हे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे आहे. अशा ठिकाणी केलेले खोदकाम अपघातास निमंत्रण देणारे असल्याने आठ दिवसांच्या आत सुरक्षित पर्यायी जागेची निवड करून तेथे व्हॉल्व्ह बसवावे. निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण न झाल्यास वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी संबंधित खड्डा समितीकडून बुजवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, राईस मिल परिसरात दीर्घकाळ सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीबाबतही समितीने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा दुरुस्ती करूनही समस्या कायम असल्याने संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवीन पाईपलाइन टाकल्यावर व गळती दुरुस्तीच्या कामानंतर शहरातील विविध ठिकाणी उघडे राहिलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. ही कामे तात्काळ पूर्ण करून रस्ते मूळ स्थितीत आणण्याची आवश्यकता आहे.
रवळनाथ कॉलनी व शिव कॉलनी परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा चाचणीसंदर्भात समितीने सांगितले आहे की, पुरेशा दाबाने आणि अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा झाल्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती किंवा डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत. अन्यथा पुन्हा खोदकाम करावे लागण्याची शक्यता आहे.
नवीन पाईपलाइन बसविताना रस्त्याच्या मधोमध असणारी चेंबर न बांधल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, दर्गा गल्लीतील पाईपलाइनचे काम पूर्ण झाले असल्याने तेथील गटारीची कामे पूर्ण होईपर्यंत रस्ता डांबरीकरण न करण्याची सूचना करण्यात आली आहे.
वाणी बोगद्याजवळ नवीन पाण्याची लाईन ही गटारी मध्ये पाईचे जोड आल्यामुळे सर्व सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईप मध्ये जाण्याची शक्यता आहे व साथीचे रोग पसरण्याची ही शक्यता आहे तसेच रस्त्याच्या मधोमध मोठा पडल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे याच्याकडेही गांभीर्याने पाहावे.
वरील सर्व बाबींवर तात्काळ व गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीकडे केली आहे.निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी), जोतिबा आजगेकर, पांडुरंग सावरतकर, जावेदभाई पठाण, मिनिन डिसोझा, दिनकर जाधव, संजय जोशी, संतोष बंदिवडेकर, रवींद्र नेवरेकर, ओंकार मनगूतकर, मदन तानवडे, सलीम लतीफ, रौनक कारेकर, रामचंद्र पंडित, प्रदीप मनगूतकर आदींच्या सह्या आहेत.
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती ऍक्टिव्ह मोडवर
|