बातम्या
आजरा साखरचा वार्षिक सभेत अनोखा व स्तुत्य उपक्रम -सभासदांतून होतंय कौतुक
By nisha patil - 9/30/2025 10:36:28 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि;अमृतनगर गवसे च्या दि. 25/09/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून कारखाना व्यवस्थापनाने कारखाना कार्यस्थळावर प्रथमच "कृषी महोत्सव"या अभिनव सदराखाली "कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन"आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबवला. या उपक्रमाचे शेतकरी, सभासद वर्गातून कौतुक होताना दिसत आहे.
आजरा तालुक्यात विविध पाणी प्रकल्प पूर्ण झाली आहेत. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ऊस क्षेत्र वाढीबरोबरच ऊसविकासाविषयीचे धोरण प्रधान्याने राबविणे गरजेचे आहे. कारखान्याला ऊसाबाबत स्वयंपूर्ण केल्याखेरीज कारखान्याला "अच्छे दिन "येणार नाहीत हे ही तितकेच वास्तव आहे.आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत.
आजही तालुक्यात बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पद्धतीने पिके घेत असलेने उत्पादनावर मर्यादा येताना दिसत आहेत. सद्या आजरा तालुक्यातील पाणी प्रकल्प मार्गी लागलेले असून पाण्याचा प्रश्न बहुतांशी मिटलेला आहे. या पाण्याचा सिंचनाखाली वापर करून पीक क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे. आज पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान व औजारे यांची जोड मिळालेस निश्चितच एकरी उत्पादनात वाढ होईल.
वाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमिनीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध होणार नाहीत किंवा पीक क्षेत्र वाढणार नाही. यासाठी उपलब्ध जमिनीतच पिकाचे जास्तीत जास्त एकरी उत्पादन घेणे आज काळाची गरज बनली आहे. यासाठी ऊस अथवा इतर पिकांचे उत्पादन घेताना एकरी उत्पन्न वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे.
विविध तांत्रिक कार्यक्रमाची योजना आखावी लागणार आहे. याच उद्देशाने शेतीसाठी आधुनिक औजारे, बी-बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते, टीश्यू कल्चर रोपे, औषध फवारणी ड्रोन इत्यादीचे जवळपास 21 स्वतंत्र स्टॉल उभे करून त्यांच्या वापराबाबत कंपनीच्या तज्ञाकडून सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणेत आले. यावेळी या प्रदर्शनाचा सभेस आलेल्या व पंचक्रोशीतील अंदाजे 2000 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
यावेळी सर्व स्टॉल धारकांना कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन सुभाष देसाई व सर्व संचालक मंडळाच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदरचे कृषी प्रदर्शन यशस्वी करणेकरिता कारखान्याचे मुख्य शेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असलेची माहिती कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी दिली.
आजरा साखरचा वार्षिक सभेत अनोखा व स्तुत्य उपक्रम -सभासदांतून होतंय कौतुक
|