बातम्या
आजरा आगारातील अनियमित बससेवा नियमित करा-सामाजिक सेवा प्रतिष्ठान
By nisha patil - 5/30/2026 11:38:43 AM
Share This News:
*आजरा आगारातील अनियमित बससेवा नियमित करा-सामाजिक सेवा प्रतिष्ठान*
**आजरा(हसन तकीलदार)**:-सामाजिक सेवा प्रतिष्ठान प्रणीत आजरा अन्याय निवारण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आजरा आगारातील अनियमित बससेवा, अपुरी वाहतूक व्यवस्था तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आजरा तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवेवर अवलंबून आहेत.आजऱ्यातील खेडेगावातून आजरा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी सर्वजण एस टी चाच उपयोग करतात.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारण कोरोना काळापासून आजरा–कोल्हापूर तसेच आजरा–बेळगाव मार्गावरील वाहतूक सेवेमध्ये गंभीर त्रुट्या जाणवत आहेत. चालक व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वारंवार बसगाड्या रद्द होणे, वेळापत्रकाचे पालन न होणे, बसगाड्यांची दुरवस्था, सकाळच्या वेळेत अपुऱ्या फेऱ्या, ऑनलाइन आरक्षणातील अडचणी तसेच ऑनलाइन पेमेंट व एन सी एम सी कार्ड स्वीकारण्यामध्ये होणाऱ्या तांत्रिक समस्या यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः बेळगावहून सकाळी ६:३० वाजताची बस वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांना सकाळी ८:३० ते ९:०० पर्यंत दुसरी सुविधा उपलब्ध राहत नसल्याची बाबही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच आगारातील अनेक बसगाड्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून नियमित साफसफाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
समितीच्या वतीने नियमित व विश्वासार्ह वेळापत्रक लागू करणे, वारंवार रद्द होणाऱ्या गाड्या कमी करणे, नवीन व सुस्थितीत बसगाड्या उपलब्ध करून देणे, ऑनलाइन आरक्षण व पेमेंट व्यवस्था सक्षम करणे, आजरा–कोल्हापूर, आजरा–बेळगाव तसेच इतर लांब पल्ल्याच्या मार्गांवरील फेऱ्या वाढविणे, चालक व वाहकांची रिक्त पदे तातडीने भरणे आणि विद्यार्थी व नोकरदारांसाठी सकाळ-संध्याकाळ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आगार व्यवस्थापक यांनी निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून १५ जूनपूर्वी संबंधित बाबींवर आवश्यक कार्यवाही करून समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
या चर्चेमध्ये नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), माजी नगरसेवक अनिरुद्ध केसरकर, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, जावेदभाई पठाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव आणि मिनीन डिसोझा आदींनी सहभाग घेतला.
आजरा आगारातील अनियमित बससेवा नियमित करा-सामाजिक सेवा प्रतिष्ठान
|