बातम्या

हिरण्याकेशी नदीत मामा भाच्याचा बुडून मृत्यू-कोवाडे बांधाऱ्याजवळची ही घटना

Ajra crime news


By nisha patil - 5/13/2026 11:54:25 AM
Share This News:



**हिरण्याकेशी नदीत मामा भाच्याचा बुडून मृत्यू-कोवाडे बांधाऱ्याजवळची ही घटना*

आजरा तालुक्यातील कोवाडे येथे हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे-कोवाडे बांधाऱ्याजवळ तोल जाऊन पडलेल्या सुनील विष्णू सुतार (वय 50,रा.कोवाडे ता. आजरा)या आपल्या मामाला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रवीण पांडुरंग सुतार (वय 36,रा. वाळकी ता. चिकोडी, कर्नाटक )या भाच्याचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना ही सोमवारी सकाळी घडली.

 

   मिळालेली अधिक माहिती अशी की, हिरलगे ता. गडहिंग्लज येथे रविवार दि. 10 मे रोजी अरुण सुतार यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सर्व नातेवाईक जमले होते. या कार्यक्रमात सुनील सुतार आणि प्रवीण सुतार हे मामा भाचेही हजर होते. रात्री कार्यक्रम आटोपून सोमवार दि. 11 मे रोजी सुनील सुतार यांनी आपला भाचा प्रवीण सुतार यास त्याच्या दुचाकीवरून सोडण्यासाठी सांगितले. त्यानुसार ते दोघेही दुचाकीवरून येताना भादवण मार्गे न येता शॉर्टकट म्हणून नजिकच्या हिरण्यकेशी नदीमार्गाने आले. कोवाड बांधाऱ्यांजवळ दुचाकी नदीकाठी उभी करून ते दोघेही बांधाऱ्याच्या लगत पाण्यातून पायी कोवाडेच्या दिशेने जात असताना बांधाऱ्यांवरील पाण्याची खोली व पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न समजल्याने मामाचा म्हणजेच सुनील सुतार यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते पाण्यात पडले. पाण्यात बुडताना पाहून मामाला वाचवण्यासाठी भाचा प्रवीण सुतार याने नदीत उडी मारली आणि मामाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु मामाला वाचवताना तोही पाण्यात बुडाला. प्रवीण घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी कोवाडेतील नातेवाईकांना फोन करून विचारले असता सुनील व प्रवीण दोघेही कोवाडे येथे आले नसल्याचे समजले. दरम्यान त्यांचा शोध सुरु असताना त्यांची मोटरसायकल हिरण्यकेशी नदीच्या काठावर आढळून आली परंतु ते दोघेही कोठे दिसून आले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला असता हिरलगे आणि कोवाडे गावाच्या मधील बांधाऱ्याजवळ दोघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करीत होते.

 

सुनील सुतार हे सुतार कामातिल अत्यंत कुशल असे कारागीर होते. सुतार कामात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी आहे. भाचा प्रवीण पांडुरंग सुतार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुली आहेत. पोलीस हवालदार साजिद शिकलदार पुढील तपास करीत आहेत.


हिरण्याकेशी नदीत मामा भाच्याचा बुडून मृत्यू-कोवाडे बांधाऱ्याजवळची ही घटना
Total Views: 7