बातम्या
आजरा नगरपंचायत हद्दीतील जर्जर व धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाईची मागणी
By nisha patil - 4/21/2026 3:20:45 PM
Share This News:
**आजरा नगरपंचायत हद्दीतील जर्जर व धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाईची मागणी*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा शहरातील जर्जर व धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की,नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी जीर्ण अवस्थेतील व धोकादायक इमारती उभ्या असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा अशा धोकादायक इमारतींचे तात्काळ सर्वेक्षण करून यादी तयार करावी आणि संबंधित मालकांना नोटीस बजावून आवश्यक ती दुरुस्ती किंवा पाडकाम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच, नोटीसचे पालन न झाल्यास नगरपंचायतीने स्वतः कारवाई करून खर्च संबंधित मालकांकडून वसूल करावा, अशी सूचनाही यात मांडण्यात आली आहे. पाडकाम करताना सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, तसेच अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, भविष्यात दिनांक २० एप्रिल रोजी दुर्घटना घडली अशा दुर्घटना टाळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणीही समितीने केली आहे.
या निवेदनावर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक परशुराम बामणे( भाऊजी),पांडुरंग सावरतकर,नगरसेवक विक्रम पटेकर,जोतीबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, जावेदभाई पठाण, मिनीन डिसोझा, संजय जोशी, संतोष बांदिवडेकर, अभिजित संकपाळ यांच्या स्वाक्षऱ्या असून नगरपंचायतीने तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आजरा नगरपंचायत हद्दीतील जर्जर व धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाईची मागणी
|