बातम्या
आजरा नगरपंचायत हद्दीतील कचरा उठाव वेळेत न झाल्यास आंदोलनाचा इशारा.-नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
By nisha patil - 8/4/2026 4:21:32 PM
Share This News:
आजरा नगरपंचायत हद्दीतील कचरा उठाव वेळेत न झाल्यास आंदोलनाचा इशारा.-नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायतीची निवडणूक होऊन महिने लोटले तरी ज्या पद्धतीने कामकाज होणे गरजेचे त्या गतीने कामकाज होत नसलेबद्दल काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्या कचरा प्रश्न सतावत आहे. अगोदरचे कचरा उठाव टेंडर संपले असून आता नवीन टेंडर काढणे गरजेचे आहे परंतु अजूनही या कामाची निविदा न निघाल्याने कचरा उठावाचा प्रश्न आ वासून उभा आहे.
प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना आपल्या प्रभागात लोकांना उत्तरे देणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी एकत्र येत कचरा उठावाबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आजरा नगरपंचायत हद्दीतील कचरा उठावाचा प्रश्न सद्या अत्यंत गंभीर बनलेला असून नागरिकांमध्ये याबाबत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन त्या उघडण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचे समजते. तरीसुद्धा संबंधीत निविदा तातडीने उघडून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी. कारण निविदा उघडल्यानंतरही प्रत्यक्ष कचरा उठाव सुरू होण्यासाठी ठेकेदारास आवश्यक पूर्तता व कामाच्या पूर्वतयारीस काही कालावधी लागतो. त्याचबरोबर नगरपंचायतीची काही वाहने नादुरुस्त असल्याचेही निदर्शनास येत आहे. म्हणून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ठेकेदाराकडून आवश्यक पूर्तता करून घेणे तसेच नादुरुस्त वाहने तात्काळ दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे. तरीही हा सर्व नागरिकांशी संबंधीत विषय असल्याने सर्व बाबींचा विचार करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. निवेदनात पुढे म्हटले आहे की,दिनांक १२/०४/२०२६ पर्यंत दररोजचा कचरा उठाव झाला नाही तर दिनांक १३/०४/२०२६ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. आजरा येथील सन्मानीय रहिवाश्यांच्या सोबतीने कचरा घेऊन नगरपंचायतीच्या दारात आणून टाकला जाईल.
आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे.निवेदनावर नगरसेवक व अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे( भाऊजी ),अभिषेक शिंपी(नगरसेवक),रेश्मा बुड्डेखान (नगरसेविका), निसार लाडजी(नगरसेवक),आसिफ सोनेखान
(नगरसेवक ),श्रीमती कलाबाई कांबळे (नगरसेविका), डॉ.सौ. स्मिता कुंभार (परळकर) (नगरसेविका),आसिफ पटेल (नगरसेवक), विक्रम पटेकर(नगरसेवक )आदींच्या सह्या आहेत.
आजरा नगरपंचायत हद्दीतील कचरा उठाव वेळेत न झाल्यास आंदोलनाचा इशारा.-नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
|