बातम्या
आजरा बाजारपेठ मेनरोडवरील रणरागीण्या कडाडल्या
By nisha patil - 3/17/2026 9:51:41 PM
Share This News:
आजरा बाजारपेठ मेनरोडवरील रणरागीण्या कडाडल्या
नगरपंचायतीची नोटीस घेऊन थेट नगरपंचायत गाठली
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायतीच्या कचरा उठावाचा पुरता फज्जा उडाला आहे. उपलब्ध तीन चार कर्मचाऱ्याकडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचरा उठाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही गल्ल्यामध्ये गेले महिना दीड महिना घंटा गाडीचे दर्शन झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे महिला वर्ग पुरता हैराण झाला आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुकानें आहेत आणि दुकानांच्या वरच्या दोन तीन मजल्यावर कुटुंबे राहतात. वरच्या मजल्यावरून खाली येईपर्यंत ट्रॅक्टर निघून गेलेले असते वेळी अवेळी ट्रॅक्टर येत असल्यामुळे कचरा टाकणे अवघड झाले आहे आणि यातच नगरपंचयातीने बाजारपेठवासियांना रस्त्यावर कचरा टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल अशी नोटीस बजावल्यामुळे बाजारपेठेतील रणरागीण्या कडाडत थेट नगरपंचायत गाठल्या आणि नगरपंचयतीला निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्हा बाजारपेठवासियांना कचरा रस्त्यावर टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करू अशी नोटीस पाठवली आहे. पण कचरा उठावाची सोय आपणच केलेली नाही. मेनरोडवर घंटागाडी येत नाही व आल्यास कचरा घेण्यास थांबत नाही. सबब कचरा घरात साठवून ठेवल्यास दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा नोटीस देऊन कारवाई करण्यापेक्षा घंटागडी पाठवून कचरा वेळेत उठाव केलेस आपली कृपा होईल व आम्ही आपले सदैव आभारी राहू असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर सुमन महेश नार्वेकर, श्वेता सूरज नार्वेकर, आदिती टोपले, महानंदा माद्याळकर, सत्यप्रिया महागावकर, सविता देसाई, स्वाती देसाई, सुषमा गोवेकर, संचिता करमळकर, स्मिता नार्वेकर, सविता टोपले, शिवानी काणेकर, सारिका देसाई, अलका हरेर आदी महिलांच्या सह्या आहेत.
आजरा बाजारपेठ मेनरोडवरील रणरागीण्या कडाडल्या
|