बातम्या

आजरा महाविद्यालयात शिक्षक–पालक मेळावा उत्साहात संपन्न

Ajra palak melava


By nisha patil - 12/26/2025 10:51:57 PM
Share This News:



*आजरा महाविद्यालयात शिक्षक–पालक मेळावा उत्साहात संपन्न*

आजरा (हसन तकीलदार )**:-आजरा महाविद्यालय येथील ज्युनिअर व्होकेशनल विभागात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी शिक्षक–पालक मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांच्यात समन्वय निर्माण व्हावा, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

 

         कार्यक्रमाची सुरुवात प्रा. एस. व्ही. गाईंगडे यांच्या प्रास्ताविक व स्वागताने झाली. त्यांनी मेळाव्याचे महत्व विशद करीत पालक–शिक्षक समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर प्रा. जे. एम. कुंभार यांनी सीईटी परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना प्रवेश प्रक्रिया, अभ्यास पद्धती व भविष्यातील शैक्षणिक संधी यांची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रा. आर. एस. राजमाने यांनी बोर्ड परीक्षेसाठी प्रभावी तयारी, वेळेचे नियोजन, लेखन कौशल्य व परीक्षेतील संभाव्य चुका याविषयी मार्गदर्शन केले.

 उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी कॉपीमुक्त अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा व शिस्त निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत शिक्षा सूचीचे वाचन सर्वांसमोर केले. त्याचबरोबर या अभियानांतर्गत पालकांकडूनही कॉपीमुक्तीसंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.

त्यानंतर प्रा. सुरुंगले ए. ए. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून कॉपीमुक्त व शिस्तपालनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादाळे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगत, पालकांनीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील हे प्रमुख उपस्थित म्हणून लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. पी. संकेश्वरी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एन. फगरे यांनी मानले. शिक्षक–पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले.


आजरा महाविद्यालयात शिक्षक–पालक मेळावा उत्साहात संपन्न
Total Views: 71