बातम्या

आजरा पंचायत समितीची मासिक सभा संपन्न

Ajra panchait samiti


By nisha patil - 12/6/2026 11:50:25 AM
Share This News:



*आजरा पंचायत समितीची मासिक सभा संपन्न*

*सदस्यांनी सर्व अधिकाऱ्यांना धरले धारेवर* 

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा पंचायत समितीची मासिक सभा नुकताच संपन्न झाली. अधिकाऱ्यांच्या कारभारावर बोट ठेवत त्यांना धारेवर धरण्यात आले.

  आजरा एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. दरवेळी पंचायत समिती मासिक सभेमध्ये आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील हे उडवाउडवीची उत्तरे देतात. यामुळे संतप्त पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आजरा एसटी आगाराचा कारभार सुधारावा अथवा एसटी आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी बदली करून घ्यावी, असे खडे बोल सुनावले गेले.गाड्या बंद करु नयेत आणि कर्मचाऱ्यावर वचक ठेवा अशी सूचना सभापती सौ.गाडे यांनी केल्या .पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ.जयश्री गाडे होत्या.

यावेळी उपसभापती यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारदे, गटविकास अधिकारी सुभाष सावंत आदिजण उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती मासिक सभेला खाते प्रमुख उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच मागील महिन्यातील आढावा घेऊनच बैठकीला उपस्थित राहण्याचे पंचायत समिती सदस्यांनी निर्देश दिले.

कृषी विभागाचा आढावा मंडल कृषी अधिकारी मोहन कुळे यांनी सांगितला. काजू रोपे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. खतांची ऑनलाईन नोंदणी व विक्री चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

खतांच्या ऑनलाइन बाबत ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठी काय उपाययोजना केली? अशी विचारणा उपसभापती यशोदा पोवार यांनी केली. एसटीचा आढावा आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी मांडला. यावेळी सर्व सदस्यांनी एसटीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच एकूण व्यवस्थापनाबद्दल ताशेरे ओढले. ग्रामीण रुग्णालयाचा आढावा डॉ. वृषाली केळकर यांनी मांडला.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घ्यावी असे सांगण्यात आले आणि वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्र व आजरा ग्रामीण रुग्णालय यातील कामाचा फरक बघून घेण्याची सूचना जि. प. सदस्य सुधीरभाऊ देसाई यांनी केली.तसेच वनविभागाच्या आढाव्यावेळी संकेश्वर -बांदा महामार्गावरील वृक्षतोड झाल्यानंतर चारपट झाडे लागवड कोठे झाली? असा सवाल उपस्थित करीत याची माहिती देण्याची जोरदार मागणी करण्यात आली . सार्वजनिक बांधकाम आढाव्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई यांनी आवंडी धनगरवाडा रस्ता शेजारी गटारी का केल्या नाहीत?अशी विचारणा केली.

आठ दिवसापूर्वी मुमेवाडी घाटात झालेल्या भिषण अपघातात चार निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराने काय काम केले? याची माहिती द्या. तसेच मुमेवाडी घाटात तातडीने गतिरोधक बसवा अशी मागणी सदस्य विकास चोथे यांनी केली.

त्याचबरोबर वनरक्षक पी. आर. पाटील यांनी जानेवारी महिन्यापर्यंत पीक नुकसान भरपाई दिली पण त्यानंतरची भरपाई दिली नसल्याचे कारण विचारता घरकुल आणि पीक नुकसानीला जिओ टॅगिंग केले जाते असे सांगितले मग झाडांना जिओ टॅगिंग का नाही? अशी थेट विचारणा चोथे यांनी केली त्याचबरोबर आजरा आगाराच्या बसगाड्या नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही नमूद केले.

रोजगार हमी योजना आढाव्यावेळी योजनेची पैसे लोकांना वेळेवर मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.सन 2011 च्या यादीनुसार सौरऊर्जा योजनेचा सर्व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा समावेश करा अशी सूचना सुधीरभाऊ देसाई आणि शिरीष देसाई यांनी केल्या.

 सहाय्य्क गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची लाभार्थी निवड सुरु असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, एकात्मिक बालविकास, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामपंचायत, प्रधानमंत्री आवास, बचत गट या विभागांचा आढावा घेण्यात आला. **गेल्या तीन सभेत काही अधिकारी उपस्थित नव्हते अशा अधिकाऱ्यांना नोटीस काढून समज द्या. माहिती व सभेत विचारलेल्या प्रश्नांची समर्पक व सक्षम उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच सभेत पाठवा अशा सक्त सूचना मांडण्यात आल्या**

यावेळी सहाय्य्क गटविकास अधिकारी सुरेश पुजारी तसेच सर्व खाते प्रमुख व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


आजरा पंचायत समितीची मासिक सभा संपन्न
Total Views: 366