बातम्या

तालुक्यात लोकप्रतिनिधिंच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ*

Ajra polio


By nisha patil - 6/28/2026 10:21:05 PM
Share This News:



**तालुक्यात लोकप्रतिनिधिंच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ*

  *जवळ जवळ 91 टक्क्यांची उद्दिष्टपूर्ती*

**आजरा (हसन तकीलदार)*: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा तालुका आजरा येथील शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई, जिल्हा परिषद सदस्य शिरिष देसाई,पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य समीर पारधे,पंचायत समिती सदस्य विकास चोथे तसेच नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

 

      यावेळी मान्यवरांनी बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओची लस देऊन देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

 

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी, मलिग्रे, भादवण, उत्तूर तसेच ग्रामीण रुग्णालय, आजरा यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यासाठी तालुक्यात 108 पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 265 कर्मचारी व 24 सुपरवायझर कार्यरत होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात 5,033 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले असून 91 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण पुढील चार दिवस घरभेटीद्वारे पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहील असेही सांगण्यात आले आहे.

या मोहिमेस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

"प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब – निरोगी बालक, पोलिओमुक्त भारत!"


तालुक्यात लोकप्रतिनिधिंच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ*
Total Views: 44