बातम्या

आजरा नगरपंचायत कार्यालयातील अनियमित, दिरंगाईपूर्ण व नागरिकहितास बाधक प्रशासकिय कारभारावर नगरसेवकांची नाराजी

Ajra81


By nisha patil - 6/7/2026 6:07:34 PM
Share This News:



**आजरा नगरपंचायत कार्यालयातील अनियमित, दिरंगाईपूर्ण व नागरिकहितास बाधक प्रशासकिय कारभारावर नगरसेवकांची नाराजी*

**कारभाराविरोधात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा नगरपंचायतिच्या कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी कामकाजात तत्परता दाखवत नसून वेळेत कामे करीत नसल्यामुळे नाराज नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयातील कारभाराविरोधात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कामात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. जर सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की,आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होऊन अनेक वर्षे उलटून गेली आहेत. नगरपंचायत स्थापन झाल्यानंरत नागरिकांना अधिक दर्जेदार व कार्यक्षम नागरी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक मुलभूत सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी, दिरंगाई व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध होत होत्या, त्या सुविधाही आज समाधानकारक पध्दतीने मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

नपरपंचायत स्थापनेच्या सुरुवातच्या काळात नवीन यंत्रणा असल्यामुळे काही प्रशासकिय अडचणी असू शकतात अशी समजुत करुन नागरिक व लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला. त्यानंतर पहिल्या नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर काही काळ प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून नगरपंचायतीचा कारभार चालविण्यात आला. त्या काळात विविध त्रुटी व नागरिकांच्या तक्रारी सातत्याने निदर्शनास आणून देण्याचे काम आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने केले व मार्गी लावण्याचे काम केले. यानंतर सन २०२५-३० या कालावधीसाठी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊन नगराध्यक्ष व विविध खाते समित्यांची स्थापना झाली. लोकप्रतिनिधी अस्तित्वात असूनही प्रशासकीय कार्यपध्दतीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यामध्ये तसेच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व गैरसमज निर्माण झाले आहेत.

सद्या शहरामध्ये नदीमध्ये पाणी उपलब्ध नसल्याचे कारण देऊन वारंवार अनियमित व अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करून शहरातील स्वच्छतेची कामे नियमितपणे होत नाहीत. अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नाही. घंटागाडी नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी घंटा गाडी जात नाही असे कारण पुढे करून घंटा गाडीचे ड्रायव्हर घंटा गाडी घेऊन जात नाहीत. घंटा गाडीवरील ड्रायवर प्रशिक्षित आहेत काय? त्यांच्याकडे चालक परवाना आहे काय? हे ही तपासणे गरजेचे आहे.शहरातील विकासा दरम्यान गटारामध्ये साठलेली माती, दगड व इतर बांधकाम साहित्य वेळेत हटवले जात नाही. याबाबत वारंवार सुचना देऊन देखील कार्यवाही होत नसल्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय नगरपंचायतीकडून विविध विकास कामाच्या निवीदा दरपत्रके (कोटेशन) व इतर खरेदी प्रक्रिया वेळेत राबविल्या जात नाहीत. अनेकवेळा निविदा प्रसिध्द करण्यात, उघडण्यात अथवा त्याबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात अनावश्यक दिरंगाई होत असलेचे निदर्शनास येत आहे. अशा कार्यपध्दतीमुळे पारदर्शकते बाबत शंका निर्माण होत असून नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधांमध्ये विलंब व अडचणी निर्माण होत आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक आम्हाला विविध समस्यांबाबत सातत्याने जाब विचारत असतात. परंतु प्रशासनाकडून योग्य व वेळेवर कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांना समाधानकारक उत्तर देणेसाठी आम्हाला कठीण व अडचणीचे होत आहे. परिणामी नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाविषयीचा लोकांचा विश्वास कमी होत आहे. म्हणून वरील सर्व बाबींची गांभिर्याने दखल घेऊन संबंधीत विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. कामकाजात पारदर्शकता आणावी, निविदा प्रक्रिया नियमानुसार व वेळेत पुर्ण करावेत. तसेच शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन,गटार सफाई, रस्त्यावरील खड्डे मुजवणे व इतर सर्व नागरि सुविधा तातडीने सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या हिताचे रक्षण करणेसाठी व लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असलेली घटनात्मक व कायदेशीर जबाबदारी पार पाडणेसाठी आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यास सर्वस्वी आपण जबाबदार रहाल असे निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे आणि कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

   निवेदनावर सौ. अश्विनी डोंगरे (उपनगराध्यक्षा), परशुराम बामणे(नगरसेवक), डॉ. सौ. स्मिता कुंभार(नगरसेवक), सौ. आसावरी खेडेकर (नगरसेविका), सौ. अन्वी केसरकर(नगरसेविका), प्रा. सौ. पूनम लिचम (नगरसेविका), सौ. रेश्मा नौशाद बुडडेखान(नगरसेविका), श्रीमती कलावती कांबळे (नगरसेविका), सौ. रहिमतबी खेडेकर(नगरसेविका), सौ. निशात समीर चांद(नगरसेविका)यांच्या सह्या आहेत.


आजरा नगरपंचायत कार्यालयातील अनियमित, दिरंगाईपूर्ण व नागरिकहितास बाधक प्रशासकिय कारभारावर नगरसेवकांची नाराजी
Total Views: 450