बातम्या

आजऱ्यात भक्तिमय वातावरणात आणि शांततेत घरगुती गणपती विसर्जन

Ajra88


By nisha patil - 9/20/2026 3:48:42 PM
Share This News:



**आजऱ्यात भक्तिमय वातावरणात आणि शांततेत घरगुती गणपती विसर्जन**

**आजरा नगरपंचायतीचे कौतुकास्पद पर्यावरण पूरक उपक्रम*

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा व परिसरातील गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी घरगुती गणपती व गौरीचे भक्तीमय वातावरणात आणि शांततापूर्वक विसर्जन पार पडले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या "," मंगल मूर्ती मोरया "च्या जयघोषात पारंपारिक वाद्यांच्या गजरात सोबत फटाक्यांच्या अतिशबाजीने बाप्पाला निरोप दिला. नबापूर नदी घाट, चित्रा नदी घाट, वडाचा गोंड, परोली बंधारा, संताजी पूल,नदीवर तसेच जवळच्या प्रवाहीत ओढ्यामध्ये गणेशमूर्ती अगदी भक्तीभावाने विसर्जित करण्यात आल्या.

     आजऱ्यातील ग्रामदैवत श्री रवळनाथाचा मानाच्या गणपतीची मूर्ती सर्वात प्रथम पालखीत विराजमान होऊन विसर्जनासाठी बाहेर काढली जाते. त्या मूर्तिसोबतच रवळनाथ देवस्थानच्या मानकऱ्यांच्याही गणेश मूर्ती पालखीतून विसर्जनासाठी पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत नेण्यात येते. त्यानंतर प्रत्येक गल्लीतील, कॉलन्यातील एकत्रितपणे विसर्जनासाठी गणेश मुर्त्या घेऊन भक्तीभावाने माता भगिनींसह बाहेर पडतात.

     आजरा नगरपंचायतीने पर्यावरण पूरक आणि स्तुत्य उपक्रम राबवित आजरा शहरातील सर्व गणेशभक्तांना गणेशमूर्तिचे नदी, तलाव, विहीरिमध्ये विसर्जन न करता नगरपंचायतीने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम कुंडात करावे व निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता निर्माल्य कुंडात देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. यासाठी नगरपंचायतीने नबापूर नदीघाट, वडाचा गोंड, परोली बंधारा येथे विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडची तर चित्रा नदीघाटावर निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली होती. पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात आले तर निर्माल्य संकलन करून प्रदूषणाला आळा घालण्याचे आदर्शवत कार्य करण्यात आले. विसर्जन ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.भक्तीमय वातावरणात व अगदी शांततेत गणपती विसर्जन पार पडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात अगदी व्यवस्थित व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


आजऱ्यात भक्तिमय वातावरणात आणि शांततेत घरगुती गणपती विसर्जन
Total Views: 233