बातम्या
शेंडूर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा
By nisha patil - 9/1/2026 11:54:29 AM
Share This News:
शेंडूर | प्रतिनिधी : अजित बोडके
शेंडूर, ता. कागल येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत असून, दि. ८ जानेवारी २०२६ पासून या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. सलग सात दिवस पारायण व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या हरिनाम सप्ताहाला १६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत भक्तिभावाने सुरू आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील भाविकांसह शेंडूर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. तुकाराम जयराम शिंदे (सर) यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी विशेषतः युवकांना उद्देशून प्रबोधन केले. तर कीर्तन सेवा अ.भ.प. बाबा महाराज पाचारणे यांनी सादर करून उपस्थित भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातले.
संपूर्ण सात दिवस हा हरिनाम सप्ताह भाविकांसाठी भक्तीची पर्वणी ठरत असून, दररोज पारायण, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी भाविकांना मिळत आहे.
शेंडूर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा
|