बातम्या
सहापदरी महामार्गासाठी सर्व घटकांना विश्वासात घ्यावे – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 7/28/2025 6:56:33 PM
Share This News:
सहापदरी महामार्गासाठी सर्व घटकांना विश्वासात घ्यावे – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतींसाठी जोडरस्त्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश
कोल्हापूर, दि. २८ – पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात औद्योगिक भागातील मागण्या आणि अडचणी लक्षात घेऊन, संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन जोडरस्त्यांचा आराखडा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या संयुक्त बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), तसेच मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, “कोल्हापूर ते सातारा दरम्यान सुरू असलेल्या सहापदरी रस्त्याच्या कामाविषयी अनेक तक्रारी आहेत. कागल, शिरोली आणि गोकुळ-शिरगाव औद्योगिक वसाहतींसाठी रस्ते दळणवळण सुलभ राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत सर्व संघटनांची बैठक घेऊन, त्यांचं मत समजून घेत आराखडा तयार करून शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा.”
या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपसंचालक गोविंद, MIDC चे प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता श्री. नाईक, तसेच मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष मोहन पाटील, इतर पदाधिकारी व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सहापदरी महामार्गासाठी सर्व घटकांना विश्वासात घ्यावे – आमदार राजेश क्षीरसागर
|