खेळ

ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धेत गैरव्यवहाराचा आरोप — खेळाडूंचा संताप, चौकशीची मागणी

Allegations of corruption in All India Inter University Mallakhamb Tournament


By nisha patil - 10/28/2025 1:50:08 PM
Share This News:



विनायक मिशन रिसर्च फाऊंडेशन (AVIT) यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धेवर गंभीर गैरव्यवहार आणि अपारदर्शक निकालांचे आरोप होत असून, देशभरातील मल्लखांब खेळाडूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्पर्धेत सहभागी विविध विद्यापीठांच्या खेळाडूंनी आयोजकांवर गुणपत्रिका न दाखवणे, होम युनिव्हर्सिटीच्या संघाचे गुण स्क्रीनवरून लपवणे आणि काही संघांना अनुचित लाभ देणे अशा अनेक अनियमिततेचे आरोप केले आहेत. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, स्पर्धा रात्री दोन वाजेपर्यंत चालवण्यात आली आणि त्यानंतर निकालात फेरफार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, वरिष्ठ प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांशी आयोजक व बाऊन्सरकडून गैरवर्तन झाल्याचेही समोर आले आहे.

“राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बाऊन्सरची गरज का भासावी?” असा सवाल खेळाडूंनी उपस्थित करत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे निदर्शनास आणले आहे. खेळाडूंनी पुढे स्पष्ट केले की, वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या स्पर्धकांच्या मेहनतीवर अन्याय होत आहे. काही आयोजक व समिती सदस्य राजकीय दबावाखाली किंवा पैशाच्या प्रभावाखाली निकाल ठरवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रशिक्षकांनी आयोजकांकडे स्कोअरशीट मागितल्यावर आयोजकांनी “आम्ही मार्क देऊ शकत नाही” असे लिखित उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना “येथे उपलब्ध नाहीत” असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर खेळाडू व प्रशिक्षकांनी हँगिंग मल्लखांबचे स्कोअर, स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ क्लिप्ससह पुरावे सादर करत चौकशीची मागणी केली आहे.

सध्या, Association of Indian Universities (AIU) आणि संबंधित राज्य व राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणांकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी खेळाडूंकडून होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर “क्रीडेत राजकारण आणि भ्रष्टाचार थांबवा” हा खेळाडूंचा नारा व्हायरल झाला असून, क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकतेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी मल्लखांब स्पर्धेत गैरव्यवहाराचा आरोप — खेळाडूंचा संताप, चौकशीची मागणी
Total Views: 823