बातम्या
अलमट्टी उंचीवाढीवर सर्वपक्षीय लढ्याला तडा..
By nisha patil - 5/20/2025 7:24:13 PM
Share This News:
अलमट्टी उंचीवाढीवर सर्वपक्षीय लढ्याला तडा..
सरकारकडून पक्षपाती भूमिका - सतेज पाटील
कोल्हापूर – अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून सर्वपक्षीय एकमत साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या लढ्याची सुरुवात इरिगेशन फेडरेशनसह सर्वपक्षीय भूमिका घेऊन केली होती. मात्र, राज्य सरकारकडून या मुद्द्यावरही राजकारण केलं जात असल्याची तीव्र टीका त्यांनी केली.
"जर आम्हाला राजकारण करायचं असतं, तर आम्ही महाविकास आघाडीतर्फे चक्काजाम केला असता. मात्र हेतू हा होता की राज्याच्या वतीने केंद्रासमोर एकसंघ भूमिका मांडावी," असं पाटील म्हणाले. त्यांनी सांगितलं की जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, अरुण लाड, रोहित पाटील आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या नेत्यांना बैठकीसाठी डावलण्यात आलं, ही बाब महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात आहे.
"ज्यांच्या मतदारसंघाला पुराचा फटका बसतो, त्यांना न बोलावता, ज्या भागात पाण्याचा तुटवडा आहे, अशा महायुतीच्या आमदारांनाच पाचारण केलं जातं, हे सरकारची पक्षपाती वृत्ती दर्शवते," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं की, विधिमंडळात कायदा जसा एकमताने मंजूर होतो, तसंच एकमत या विषयातही दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र सरकारने फक्त महायुतीच्या आमदारांनाच सहभागी करून घेऊन दुर्भाग्यपूर्ण भूमिका घेतली आहे.
"आता ही वेळ आहे सरकारविरोधात आवाज उठवण्याची. आम्ही उद्यापर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. पण या विषयावरही राजकारण करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे," असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
अलमट्टी उंचीवाढीवर सर्वपक्षीय लढ्याला तडा..
|