विशेष बातम्या
आपत्तीमुळे जीवन उध्वस्त होणार नाही याची कायम काळजी घ्या – डॉ. जयपाल पाटील
By nisha patil - 12/13/2025 6:22:44 PM
Share This News:
आपत्तीमुळे जीवन उध्वस्त होणार नाही याची कायम काळजी घ्या – डॉ. जयपाल पाटील
आय.ई.एस. वरसोली हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
अलिबाग : आपत्तीमुळे आपले अनमोल जीवन आणि कुटुंबाचे भवितव्य उध्वस्त होणार नाही, यासाठी नेहमी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले. आय.ई.एस. वरसोली हायस्कूलच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आई-वडील घरी नसताना गॅस सिलेंडर, विद्युत उपकरणे वापरणे किंवा वाहन परवाना नसताना दुचाकी-चारचाकी रस्त्यावर नेणे टाळावे. अशा निष्काळजीपणामुळे अपघात होऊन स्वतःचे जीवन धोक्यात येतेच, शिवाय आई-वडिलांवर कायदेशीर अडचणीही येतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक किरण पाटील यांनी डॉ. जयपाल पाटील यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. पाटील यांनी संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी रायगड पोलीस वाहतूक शाखेचे हवालदार साळुंके यांनी नवीन वाहतूक कायद्याची माहिती देत अल्पवयीन वाहनचालकांवर होणाऱ्या कारवाईबाबत मार्गदर्शन केले. भाषातज्ज्ञ सुनील प्रधान यांनी आरोग्याबरोबरच मराठी, इंग्रजी, हिंदीसह जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, हिब्रू अशा भाषांचे शिक्षण घेण्याचे महत्त्व सांगितले.
श्री. दर्शन प्रभु यांनी मोबाईलच्या अतिवापरापेक्षा मैदानी खेळांवर भर देण्याचा सल्ला देत, खेळामुळे शरीर मजबूत व तंदुरुस्त राहते, असे सांगितले. तसेच साप-विंचू दंश किंवा अपघात झाल्यास १०८ रुग्णवाहिका, तर बाळंतपणासाठी १०२ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी १०८ रुग्णवाहिकेचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे वापर कसा करावा, याची माहिती डॉ. निर्मला डांगे यांनी दिली.
घरामध्ये लागलेल्या छोट्या आगी कशा विझवाव्यात, याचे प्रात्यक्षिक डॉ. जयपाल पाटील यांनी दाखवले. कार्यक्रमास आय.ई.एस. शाळेतील १६५ विद्यार्थी-विद्यार्थिनी, १५ शिक्षक व कर्मचारी, तसेच राजिप प्राथमिक शाळेतील २० विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षिका सौ. मनिषा पाटील, सौ. आसावरी मांगलेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गुरव मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन करण्यात आले.
आपत्तीमुळे जीवन उध्वस्त होणार नाही याची कायम काळजी घ्या – डॉ. जयपाल पाटील
|