बातम्या

मनोयात्र्यांच्या चेहऱ्यावर असीम प्रभा आणून जीवनात वसंत फुलावणारा अवलिया म्हणजे अमित वसंत प्रभा

Amit Vasant Prabha is an extraordinary soul


By nisha patil - 2/11/2026 3:09:51 PM
Share This News:



मनोयात्र्यांच्या चेहऱ्यावर असीम प्रभा आणून जीवनात वसंत फुलावणारा अवलिया म्हणजे अमित वसंत प्रभा

 प्रतिनिधी हसन तकीलदार समाजात अनेकजण स्वतःच्या सुखासाठी धडपडत असतात. मात्र, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारी माणसंही असतात. अशाच एका अवलियाची ही प्रेरणादायी कहाणी... नाव आहे अमित वसंत प्रभा आणि गाव आहे आजरा तालुक्यातील पेरणोली! २००९ मध्ये रस्त्याच्या कडेला एका असहाय महिलेची दयनीय अवस्था पाहून अमित यांचं आयुष्यच बदललं. त्या महिलेच्या अंगावर किडे पडले होते. अमित यांनी तातडीने तिला कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रात दाखल केले. उपचारानंतर तिला उत्तर प्रदेशातील तिच्या घरी पोहोचवले. याच एका घटनेतून मनोरुग्णांच्या सेवेला त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं.

सुरुवातीला भाड्याच्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आज माणुसकीच्या मोठ्या चळवळीत बदलला आहे. नेपाळसह उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम अशा विविध ठिकाणच्या ९० हून अधिक मनोरुग्णांना अमित यांनी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवलं आहे.अनेक रुग्णांची अवस्था इतकी गंभीर असते की, त्यांना स्वतःची स्वच्छताही करता येत नाही. अंगावर जखमा, वाढलेली नखे, केस आणि असह्य वेदना... अशा परिस्थितीतही अमित प्रेमाने त्यांचा विश्वास संपादन करतात. उपचार, स्वच्छता, अन्न आणि सुरक्षित निवारा देत त्यांना पुन्हा जगण्याची उमेद देतात.

या सेवाकार्यासाठी त्यांनी चांगल्या पगाराच्या अनेक नोकऱ्याही सोडल्या. स्वतःच्या संसारातील अनेक अडचणी स्वीकारल्या. मित्रांच्या मदतीने मिळालेल्या छोट्या रुग्णवाहिकेतून आजही त्यांची ही सेवायात्रा सुरू आहे.या कार्याला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी त्यांनी 'माणुसकी फाउंडेशन'ची स्थापना केली असून, मनोरुग्णांसाठी 'मनोयात्री निवारा प्रकल्प' उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

खरंच, मनोरुग्णांमध्येही माणूस पाहणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा वसंत फुलवणाऱ्या अमित वसंत प्रभा यांचं कार्य म्हणजे माणुसकीचं जिवंत उदाहरण आहे! कारण, एखाद्याला नव्याने जगण्याची संधी देण्यापेक्षा मोठी माणुसकी दुसरी कोणतीच नाही!

 


मनोयात्र्यांच्या चेहऱ्यावर असीम प्रभा आणून जीवनात वसंत फुलावणारा अवलिया म्हणजे अमित वसंत प्रभा
Total Views: 15