शैक्षणिक
किटवडेपैकी धनगरवाड्यावरील गौरीने बारावीत बॅंकींग अभ्यासक्रमातून मिळविले ६८.५० टक्के गुण
By nisha patil - 5/5/2026 5:15:35 PM
Share This News:
किटवडेपैकी धनगरवाड्यावरील गौरीने बारावीत बॅंकींग अभ्यासक्रमातून मिळविले ६८.५० टक्के गुण
आजरा(हसन तकीलदार) - महाविद्यालयात यायचे म्हणजे तीन किलोमीटरची पायपीट.. त्यानंतर २३ किलोमीटरचा प्रवास एसटी ने करायचा.ऊन, वारा, पाऊस व जंगली जनावरांचे दर्शन दैनंदिनीच..घरची परिस्थिती बेताची, प्रती चेरापुंजी असलेल्या या सर्वावर मात करीत किटवडेपैकी धनगरवाडा ( ता. आजरा ) येथील गौरी शेळके या विद्यार्थिनीने बारावी बोर्ड परीक्षेत ६८.५० टक्के गुण मिळवून ऊन, वारा, पाऊस यांच्याशी संघर्ष करीत घवघवीत यश मिळविले आहे.
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडिलांचे करोनामध्ये निधन झाले. आई सुनीता हीच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मनात शिकण्याची जिद्द होती पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबण्याची भिती वाटत होती. अशा स्थितीत दहावीच्या परीक्षेनंतर सावंतवाडीत एका खाजगी दवाखान्यात काम केले. अकरावीत प्रवेश घेण्याचे निश्चीत केले. याच दुर्गम भागात शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पडणारे आणि शिक्षकी पेशातूनच सामाजिक कार्य करणारे मराठी शाळेचे शिक्षक उत्तम कोकीतकर यांची भेट घेतली आणि आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागातील बँकिंग अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेतला. शिक्षक उत्तम कोकितकर यांची साथ मोलाची ठरली.ऊन, वारा, पाऊस यांचेशी संघर्ष करीत दररोजची पायपीट सुरू झाली. सकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडलेली गौरी दुपारी दोन वाजता घरी पोहोचायची. महाविद्यालयातील प्रा.मनोजकुमार पाटील, प्रा.सदाशिव मोरे यासह सर्व शिक्षकांनी गौरीला चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळेच बारावीच्या परीक्षेत ६८.५० टक्के इतके गुण मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली. दररोज गवे,अस्वले, रानडुकरे किंवा जंगली जनावरांचे दर्शन ठरलेले असायचे. मनात भिती वाटायची मात्र शिकण्याची जिद्द होती. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही किटवडेपैकी धनगरवाड्यावरील गौरी शेळके हिने मिळविलेले बारावी बोर्डाच्या परीक्षेतील यश निश्चितच कौतुकास्पद आहे.तिच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
किटवडेपैकी धनगरवाड्यावरील गौरीने बारावीत बॅंकींग अभ्यासक्रमातून मिळविले ६८.५० टक्के गुण
|