बातम्या
पहिली उचल पाच हजार, गत हंगामातील ३०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही!
By nisha patil - 10/19/2026 4:51:41 PM
Share This News:
पहिली उचल पाच हजार, गत हंगामातील ३०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही!
आंदोलन अंकुशचा शिरोळ येथे एल्गार; ऊस दरासाठी आरपारच्या लढ्याचा निर्धार
शिरोळ | प्रतिनिधी : आचिन हेरवाडे शिरोळ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ५ हजार रुपये आणि गत हंगामातील दुसरा हप्ता प्रतिटन ३०० रुपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला. शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात रविवारी आयोजित संघटनेच्या नवव्या एल्गार सभेत ते बोलत होते.
देशात साखरेचे दर वाढलेले असताना बाजारात साखर प्रतिकिलो ५० रुपयांच्या वर विकली जात आहे. इथेनॉल, मोलॅसिस आणि बगॅस यांसारख्या उपपदार्थांनाही चांगला दर मिळत आहे. असे असतानाही कारखानदार शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला देत नसल्याची टीका चुडमुंगे यांनी केली. कारखानदारांनी टोलवाटोलवी न करता शेतकऱ्यांना पहिली उचल ५ हजार रुपये द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
गत हंगामातील ३०० रुपये मिळाल्याशिवाय माघार नाही!
गत हंगामातील दुसरा हप्ता प्रतिटन ३०० रुपये आणि चालू हंगामातील पहिली उचल ५ हजार रुपये मिळेपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलन अंकुशने घेतली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी संघटना रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे चुडमुंगे यांनी स्पष्ट केले.
ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करताना, जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही कारखान्याची ऊसतोड स्वीकारू नये, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून आगामी हंगामात दरासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पहिली उचल पाच हजार, गत हंगामातील ३०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही!
|