बातम्या
पंधरा वर्षाची अखंडित परंपरा ; पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर शस्त्र पूजेचे अनोखे सिमोल्लंघन
By nisha patil - 10/20/2026 11:30:35 PM
Share This News:
पंधरा वर्षाची अखंडित परंपरा ; पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर शस्त्र पूजेचे अनोखे सिमोल्लंघन
कोल्हापूर : विद्यार्थ्यांसाठी पेन हे शस्त्र असते,शेतकऱ्यांसाठी नांगर हे शस्त्र असते, सैनिकांसाठी बंदूक हे शस्त्र असते आणि खेळाडूंसाठी त्याचे क्रीडा साहित्य हेच शस्त्र असते. याची मूर्तीमंत प्रचिती आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांताराम पंत वालावलकर हायस्कूलच्या क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी खेळाडूंनी सप्रमाण सिद्ध केले आणि खऱ्या अर्थाने दसऱ्याचे सिमोल्लंघन केले .
लव्ह बेसबॉल ही थीम राबवून शाळेचे क्रीडाशिक्षक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, क्रीडाशिक्षक समीर जमादार आणि शाळेचे विद्यार्थी खेळाडू यांनी शाळेच्या मैदानावर बेसबॉल, कब्बडी ही दोन मैदाने पारंपारिकरित्या मांडणी करून रांगोळी तसेच फुलांची रंगीबेरंगी आरास करून सजवली होती . यामागची संकल्पना सांगताना राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी दसरा हा भक्ती बरोबर शौर्याचा सण असून क्रीडा साहित्य हेच खेळाडूंचे खरे शस्त्र असल्याने पंधरा वर्षे याप्रकारे अखंडीत क्रीडा साहित्याचे पूजन करतो तेच आमच्या सर्वंकष यशाचे परिमाण असल्याचे सांगितले . नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि शाळेतील शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि माजी राष्ट्रीय खेळाडू दीपाली धनवडे यांच्या हस्ते बेसबॉल आणि कब्बडी मैदानाचे तसेच क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले .
यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी मनोगत व्यक्त करतानाच शाळेच्या विद्यार्थी खेळाडूंनी देशपातळीवर नावलौकीक करावा अशा सदिच्छा दिल्या . समीर जमादार यांनी आभार प्रदर्शन केले . याप्रसंगी माजी राष्ट्रीय खेळाडू श्रीवर्धन बनसोडे, विशाल निगडे, अक्षय कदम यासह विभागीय स्तरावर निवड झालेले शाळेचे विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते .
पंधरा वर्षाची अखंडित परंपरा ; पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर शस्त्र पूजेचे अनोखे सिमोल्लंघन
|