बातम्या
आंदोलन अंकुशचे ऊस दर आंदोलन स्थगित;
By nisha patil - 11/11/2026 5:39:15 PM
Share This News:
आंदोलन अंकुशचे ऊस दर आंदोलन स्थगित;
उद्यापासून शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकाराव्यात
सात ते आठ महिन्यांत शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी नवा लढा उभारणार; *# धनाजी चुडमुंगे यांची घोषणा...
शिरोळ : प्रतिनिधी, आचिन हेरवाडे.. शेतकऱ्यांच्या वाढीव ऊस दरासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शिरोळ तालुक्यात सुरू असलेले ऊस दर आंदोलन अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून (दि. ११ नोव्हेंबर) शेतकऱ्यांनी ऊसतोडी स्वीकाराव्यात, असे आवाहन संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. मात्र, आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकऱ्यांच्या हक्काच्या दरासाठीचा लढा संपलेला नसून, येत्या सात ते आठ महिन्यांत नव्या संघर्षाची तयारी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी (दि. १०) सायंकाळी शिरोळ येथील छत्रपती शिवाजी तख्त येथे आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. छत्रपती शिवरायांच्या गादीला वंदन करून यंदाचे ऊस दर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले, "यंदा कारखानदार आणि स्वाभिमानी संघटनेने ठरवून आंदोलन लांबवले. त्यामुळे आता आंदोलन आणखी लांबवणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता यंदाचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."
यंदाच्या ऊस दर आंदोलनात साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या दरवाढीचा मुद्दा कारखानदार व स्वाभिमानी संघटनेच्या युतीने पुढे आणला. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजार रुपयांचा तोटा झाला, तर कारखानदारांना एक हजार रुपयांचा फायदा झाला, असा आरोप चुडमुंगे यांनी केला. येत्या सात ते आठ महिन्यांत या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असून, आंदोलनाची खरी सुरुवात आता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाढीव ऊस दर मिळवून देण्यासाठी संघटना नियोजनबद्ध पद्धतीने लढा उभारणार आहे. यंदा ऊसतोडी नाकारून संघटनेच्या भूमिकेला ठाम साथ देणाऱ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
दरम्यान, कोल्हापूर येथे झालेला ऊस दराचा तोडगा अमान्य करत आंदोलन अंकुश संघटनेने ५ नोव्हेंबरपासून शिरोळ तालुक्यात आंदोलन सुरू केले होते. वाढीव ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला तालुक्यातील सुमारे ९५ टक्के शेतकऱ्यांनी ऊसतोडी नाकारून मोठी साथ दिली होती. त्यामुळे तालुक्यातील जवाहर, पंचगंगा यांसह परिसरातील साखर कारखान्यांच्या ऊसतोड व वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही सामान्य शेतकऱ्यांनी आंदोलनाची धुरा आपल्या हातात घेतली आणि आंदोलनाची धग कायम ठेवली. शेतकऱ्यांच्या या एकजुटीचे आणि विश्वासाचे धनाजी चुडमुंगे यांनी विशेष आभार मानले.
आंदोलन स्थगित झाले असले तरी ऊस दराचा प्रश्न संपलेला नाही. यंदाच्या आंदोलनातून मिळालेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि एकजूट लक्षात घेऊन पुढील हंगामात अधिक नियोजनबद्ध आणि व्यापक लढा उभारण्याचा निर्धार आंदोलन अंकुश संघटनेने व्यक्त केला आहे.
आंदोलन अंकुशचे ऊस दर आंदोलन स्थगित;
|