बातम्या

'आंदोलन अंकुश'ची रविवारी शिरोळमध्ये 'एल्गार सभा' 

Andolan Ankush to hold Elgar Sabha


By nisha patil - 10/13/2026 7:39:38 PM
Share This News:



'आंदोलन अंकुश'ची रविवारी शिरोळमध्ये 'एल्गार सभा' 
 

धनाजी चुडमुंगे; प्रतिटन पाच हजारासाठी ठरणार आंदोलनाची दिशा

शिरोळ दि.१३ प्रतिनिधी- आचिन हेरवाडे 'आंदोलन अंकुश'च्यावतीने यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये हा योग्य भाव मिळावा याकरिता आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी शिरोळ येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सहा वाजता एल्गार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, 'आंदोलन अंकुश'चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. 
   

श्री चुडमुंगे म्हणाले, यावर्षी साखरेची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे साखरेला दरही चांगले मिळणार आहेत. तर ऊसाला वाढत्या उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यावर्षी तुटणाऱ्या उसाला प्रति टन पाच हजार रुपये हा योग्य दर मिळावा यासाठी 'आंदोलन अंकुश'चा लढा असणार आहे. वाढलेले साखर दर आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली उसाची टंचाई याचा विचार करता यावर्षीचा हंगाम हा सर्वार्थाने आव्हानात्मक असणार आहे. 
   

देशात साखरेचा साठा शिल्लक नाही. यावर्षी साखर उत्पादन पण घटणार असल्याचा अंदाज आहे. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि पाऊस कमी पडल्यामुळे घटलेले एकरी ऊस उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना ऊस शेती न परवडणारी आहे. आगामी ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या संघटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद साधला असता सगळ्याच शेतकऱ्यांनी पाच हजारहून अधिक भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्राप्त परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि साखर कारखान्याकडून ऊस दरावर बाळगले गेलेले मौन पाहता यंदाही हंगामाच्या तोंडावर आंदोलन करायचे अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. 
   

गेल्या चार ते पाच हंगामात कारखान्यांना बाजारात साखर, मळी, बग्यासला चांगला दर मिळून कारखाने मोठया नफ्यात आहेत. मिळालेल्या नफ्यातील योग्य वाटा कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी आपली आग्रही मागणी आहे. येत्या हंगामात पाच हजार रुपये दरासाठी आंदोलनाची काय दिशा असावी याची व्यापक आणि जाहीर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 
रविवारी १८ ऑक्टोबर रोजी शिरोळ येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सहा वाजता एल्गार सभा बोलावण्यात आली आहे. 
    हंगाम अडथळ्याविना सुरू व्हावा अशी कारखानदारांची अपेक्षा असेल तर आंदोलना आधीच संघटनेशी चर्चा करून पाच हजार रुपये दरावर सकारात्मक निर्णय घोषित करावा. अन्यथा संघर्ष अटळ असल्याचेही श्री चुडमुंगे यांनी सांगितले. यावेळी राकेश जगदाळे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील तालुकाध्यक्ष नागेश उपाध्यक्ष संभाजी शिंदे  अमोल गावडे बिरू पुजारी पोपट संकपाळ दत्तात्रय जगदाळे पप्पू काळे संभाजी शिंदे देवेंद्र चौगुले बाळासाहेब भोगावे राजू आवळे चंदू पाटील यांच्यासह आंदोलन अंकुश चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


'आंदोलन अंकुश'ची रविवारी शिरोळमध्ये 'एल्गार सभा' 
Total Views: 24