बातम्या
आजरा नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरोधात संताप.
By Administrator - 5/1/2026 4:06:51 PM
Share This News:
आजरा नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरोधात संताप.
अन्याय निवारण समिती अध्यक्ष व नूतन नगरसेवक ऍक्टिव्ह मोडवर
आजरा(हसन तकीलदार):- आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती कडून नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आजरा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,आजरा नगरपंचायत हद्दीतील गांधीनगर येथील क्रिडासंकुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो वारंवार पेटविण्यात येत आहे. त्यामुळे क्रिडासंकुल, हॉस्पिटल,आवंडी वसाहत तसेच गांधीनगर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून वयोवृद्ध नागरिक, लहान मुले व रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे शासनामार्फत “क्षयमुक्त महाराष्ट्र” अभियान प्रभावीपणे राबविले जात असताना, दुसरीकडे नगरपंचायत हद्दीत कचरा जाळण्यासारखे प्रकार सुरू असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
दरम्यान, आजरा शहरातील आयडियल कॉलनी, शिव कॉलनी व समर्थ कॉलनी या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने नगरपंचायतीविरोधात नाराजी वाढली आहे.
तसेच चित्री धरण प्रकल्पग्रस्तांची आपली घरे, जमिनी प्रकल्पसाठी दिलेल्या आहेत त्या आवंडी वसाहत येथे माणसांना आणि जनावरांनाही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.याबरोबरच काही ठिकाणी दोन तीन दिवस घंटा गाडीचा पत्ताच नाही त्यामुळे लोकांचा कचरा साठून आहे. बाजारपेठ, राईस मिल जवळीली पाण्याच्या टाकी जवळ सईद स्प्रे पेंटरच्या गॅरेज समोर तीन चार दिवसापासून पाण्याच्या पाईपची गळती झाली आहे तसेच बाजारपेठेतही गळत्या झाल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर जनावरे बांधून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा, इशारा आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने दिला आहे.
या निवेदनावर बामणे भाऊजी (नूतन नगरसेवक), पांडुरंग सावरतकर( सचिव),
रामचंद्र पंडीत, जोतीबा आजगेकर, संजय जोशी, दिनकर जाधव, बंडोपंत चव्हाण, संतोष बांदिवडेकर, मिनीन डिसोझा, मदन तानवडे, महादेव राणे, अभिजीत संकपाळ, सुरज पाटील व महेश खेडेकर,आसावरी खेडेकर(नूतन नगरसेविका) यांच्या सह्य़ा आहेत.
आजरा नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरोधात संताप.
|