बातम्या

कोल्हापूर महानगरपालिकेतील गोंधळावर संताप

Anger over chaos in Kolhapur Municipal Corporation


By Administrator - 3/20/2026 3:54:29 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिकेतील गोंधळावर संताप

हिंदू एकता आंदोलनाची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी): हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका च्या अलीकडील सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

सभागृहातील लोकप्रतिनिधींच्या गैरवर्तनावर टीका करताना, “हे लोकशाहीचे मंदिर आहे की कुस्त्यांचा आखाडा?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.

कामकाजाचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’ करण्याची मागणी

महानगरपालिकेतील कामकाज पारदर्शक व्हावे आणि नागरिकांना प्रत्यक्षात काय सुरू आहे हे समजावे, यासाठी सभागृहातील कामकाजाचे यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करण्यात आली. विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे लाईव्ह टेलिकास्ट केल्यास नागरिकांचा विश्वास वाढेल, असे संघटनेने म्हटले आहे.

दोषी नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करा

सभागृहात ५० टक्के महिला नगरसेविका असताना काही नगरसेवकांचे वर्तन महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याचा आरोप करण्यात आला. गोंधळ घालणाऱ्या आणि अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नगरसेवकांवर पक्षभेद न करता तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. “ज्यांना कुस्ती खेळायची आहे त्यांनी खासबाग मैदानावर जावे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला.

सभागृहाची क्षमता वाढवण्याची मागणी

सध्याचे सभागृह नगरसेवकांच्या संख्येस अपुरे पडत असून प्रेक्षक गॅलरीची क्षमता केवळ २०-२५ लोकांची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अधिक मोठ्या आणि सुसज्ज ठिकाणी कामकाज हलवावे किंवा गॅलरीची क्षमता वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.


कोल्हापूर महानगरपालिकेतील गोंधळावर संताप
Total Views: 30