राजकीय
कागल तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात संतप्त आवाज; पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी
By nisha patil - 2/5/2026 1:12:02 PM
Share This News:
कागल तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात संतप्त आवाज; पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी
कागल तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याविरोधात आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तालुक्यात गुटखा, गांजा विक्रीसह सावकारीसारखे बेकायदेशीर व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे.
सीमाभागातील परिस्थितीचा गैरफायदा घेत कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असून, तो तालुक्यात सहज उपलब्ध होत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत लोटली जात असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा मात्र ‘बघ्याची भूमिका’ घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
याचबरोबर, तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाने थैमान घातले असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जाचक अटींवर कर्ज देऊन त्यांची अक्षरशः लूट केली जात आहे. अनेकांना धमक्या, मानसिक छळ आणि दडपशाहीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
विशेष म्हणजे, मुरगूड, बिद्री, कागल एमआयडीसी परिसर व सीमाभागातील गावांमध्ये हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर संबंधितांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार देत, “गांजा विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर तात्काळ धाड टाकून कठोर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांचा बंदोबस्त करावा,” अशी ठाम मागणी केली आहे.अन्यथा आंदोलनाचा इशारा जर प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुका संघटक मारुती पुरीबुवा, उपतालुकाप्रमुख समीर देसाई, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अशोकराव पाटील, विभाग प्रमुख दिग्विजय पाटील, अमृत पाटणकर, डॉक्टर के एम पाटील, हरी पाटील,यशवंत पाटील, सर्जेराव जाधव व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके
कागल तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात संतप्त आवाज; पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी
|