बातम्या

श्रद्धा अॅकॅडमीवर संतप्त तरुणांची दगडफेक...

Angry youth pelt stones at Shraddha Academy


By Administrator - 6/18/2025 3:49:32 PM
Share This News:



श्रद्धा अॅकॅडमीवर संतप्त तरुणांची दगडफेक...

‘मुलगा गेला, पण प्रश्न अनुत्तरित!’ श्रद्धा अॅकॅडमीवर नातेवाईक व तरुणांचा आक्रोश

इचलकरंजीतील सुतारमळा परिसरात भंडारी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या यश अजित यादव (वय १७, रा. पलूस, सांगली) या बारावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तो श्रद्धा अॅकॅडमीत शिक्षण घेत होता.

सदर घटना समजताच यशचे नातेवाईक इचलकरंजीत दाखल झाले असून त्यांनी याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. यशला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी मृतदेहाचा शवविच्छेदन सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे करण्याची मागणी मान्य करण्यात आली.

दुपारनंतर संतप्त तरुणांनी श्रद्धा अॅकॅडमीवर हल्ला करत दगडफेक केली, काचा फोडल्या व पोस्टर फाडले. जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमावाला शांत करत काहींना पोलीस ठाण्यात नेले.

या घटनेवर श्रद्धा अॅकॅडमीचे संस्थापक ए.आर. तांबे यांनी दु:ख व्यक्त करत, “ही घटना अत्यंत वेदनादायक असून आम्ही पालकांच्या दुःखात सहभागी आहोत. आमची संस्था विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच आहे, आम्ही यापूर्वी हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे,” असे सांगितले.

या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


श्रद्धा अॅकॅडमीवर संतप्त तरुणांची दगडफेक...
Total Views: 159