बातम्या

पाच हजार अंतिम ऊस दरासाठी आंदोलन अंकुशचा कारखानदारांना इशारा

Ankush issues warning to sugar mill owners


By Administrator - 5/11/2026 10:28:41 PM
Share This News:



पाच हजार अंतिम ऊस दरासाठी आंदोलन अंकुशचा कारखानदारांना इशारा
 

‘चार हजार रुपये दरात ऊस शेती परवडत नाही’; पाच हजार अंतिम दर जाहीर करा, अन्यथा ऊसतोड-वाहतूक बंद!.... 
 

श्री दत्त, शरद व जवाहर साखर कारखान्यांना आंदोलन अंकुशचे निवेदन....; किरकोळ दरवाढीवर आंदोलन मिटले तरी शिरोळ तालुक्यात लढा सुरूच : धनाजी चुडमुंगे...... ््््््
 

शिरोळ : प्रतिनिधी, आचिन हेरवाडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रति टन पाच हजार रुपये अंतिम ऊस दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेने श्री दत्त, शरद आणि जवाहर साखर कारखान्यांच्या चेअरमन व कार्यकारी संचालकांना निवेदन दिले आहे. चार हजार रुपये दरात ऊस शेती करणे अशक्य असल्याचे स्पष्ट करत वाढीव दर जाहीर करून सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाच हजार दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा!

 

यंदा ऊस उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एकरी ऊस उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे चार हजार रुपये दरात उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी निवेदनातून मांडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत कारखानदारांकडून ऊस दराबाबत कोणतीही सार्वजनिक घोषणा करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
 

दरवर्षी संबंधित कारखान्यांना ऊस पुरवठा करणारे उत्पादक सभासद असतानाही यंदा ऊस शेती परवडत नसल्याचे सांगत, पाच हजार रुपये अंतिम दर देण्याची जाहीर घोषणा करूनच कारखाने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
 

दर जाहीर न केल्यास ऊसतोड-वाहतूक रोखणार!
पाच हजार रुपये अंतिम दर जाहीर करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. अन्यथा ऊसतोड देऊ नये, ऊस वाहतूक करू नये आणि साखर कारखाने सुरू करण्यास विरोध केला जाईल, असा इशारा आंदोलन अंकुशने दिला आहे.

 

जिल्ह्यात किरकोळ दरवाढीवर आंदोलन मिटले असले, तरी शिरोळ तालुक्यात ऊस दरासाठीचा लढा पुढे सुरूच राहणार आहे.
 

“पाच हजार रुपये अंतिम ऊस दराच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. चार हजार रुपये दरात ऊस शेती करणे शक्य नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेऊन कारखानदारांनी वाढीव दर जाहीर करावा. अन्यथा शिरोळ तालुक्यात आंदोलन सुरूच राहील,” असा निर्धार आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केला.


पाच हजार अंतिम ऊस दरासाठी आंदोलन अंकुशचा कारखानदारांना इशारा
Total Views: 68