बातम्या

अण्णासाहेब पाटील महामंडळाची उद्योजकता क्रांती

Annasaheb Patil Corporation


By nisha patil - 8/30/2025 2:58:40 PM
Share This News:



अण्णासाहेब पाटील महामंडळाची उद्योजकता क्रांती

कोट्यावधींचे अर्थसहाय्य, हजारो तरुणांना 'आत्मनिर्भर'तेची दिशा

कोल्हापूर दि. ३० ऑगस्ट : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करून हजारो तरुणांना आणि गटांना उद्योजकतेची नवी दिशा दिली आहे. २१ नोव्हेंबर, २०१७ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या या योजनांनी राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात महामंडळामार्फत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण रु. ३० कोटी ९० लाख १० हजार एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. जिल्ह्यातील या योजनेतील कामकाज राज्यात अग्रस्थानी आहे. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - एक मैलाचा दगड
उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरली आहे. यामध्ये पुरुषांसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आणि महिलांसाठी ५५ वर्षे ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एकाच कुटुंबातील (रक्त नाते संबंधातील) व्यक्ती कर्जदार किंवा सहकर्जदार असल्या तरी महामंडळ अशा प्रकरणांना देखील मंजुरी देते, ज्यामुळे कौटुंबिक व्यवसायांनाही पाठबळ मिळते.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आकडेवारी लक्षणीय आहे
एकूण ४७ हजार ४८५ अर्जदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार ५७७ जणांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले. २० हजार ३२७ लाभार्थ्यांचे बँक कर्ज मंजूर झाले आहे. महामंडळाकडून व्याज परताव्यासाठी १९७४० लाभार्थी मंजूर झाले असून, १९०९० लाभार्थ्यांचा व्याज परतावा सुरू झाला आहे. बँकांनी वितरित केलेली एकूण कर्ज रक्कम १८५० कोटी ६४ लाख ४९ हजार ४५१ रुपये आहे. आजपर्यंत महामंडळाने २२३ कोटी ११ लाख रुपये इतका मोठा व्याज परतावा केला आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना - सामूहिक प्रयत्नांना बळ
सामूहिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेतर्गत पाच व्यक्तींच्या गटाला किमान रु. १० लाख ते कमाल रु. ५० लाखांपर्यंतच्या कर्ज मर्यादेवर व्याज परतावा दिला जातो. या योजनेत अलीकडे काही महत्त्वाच्या शिथिलता आणल्या आहेत. दोन व्यक्तींसाठी कमाल रु. २५ लाख मर्यादित कर्ज. तीन व्यक्तींसाठी कमाल रु. ३५ लाख मर्यादित कर्ज. चार व्यक्तींसाठी कमाल रु. ४५ लाख मर्यादित कर्ज. पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखांवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शेती पूरक व्यवसाय करणाऱ्यांना आणि महिला बचत गटांकरीता असलेली कमाल वयोमर्यादेची अट या योजनेतून वगळण्यात आली आहे.

या योजनेची सद्यस्थिती देखील आश्वासक आहे
एकूण ३३१ गट अर्ज करत आहेत. ९९ गटांना पात्रता प्रमाणपत्र मिळाले आहे. १५२ लाभार्थी गटांचे बँक कर्ज मंजूर झाले आहे. १४६ गटांचा व्याज परतावा सुरू झाला असून, आजपर्यंत ४ कोटी ६६ लाख १३ हजार २९७ रुपये एवढा व्याज परतावा झाला आहे.

गट प्रकल्प कर्ज योजना - प्रगतीपथावर
शेतकरी उत्पादक संस्था गटांसाठी असलेल्या या योजनेतर्गत २० पेक्षा जास्त सदस्य असलेल्या गटांच्या संचालकांना सदस्यांच्या उत्पादनाचे पुरावे अपलोड करणे अनिवार्य आहे. सध्या १७ एफपीओ गट अर्ज करत असून, २ अर्ज जमा झाले आहेत. ही योजना देखील भविष्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास मदत करेल.

एकूणच, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आपल्या विविध योजनांद्वारे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना सक्षम करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनांमुळे केवळ रोजगार निर्मितीच होत नाही, तर आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या स्वप्नालाही बळ मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभ तसेच अधिक माहितीसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कोल्हापूर जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. 


अण्णासाहेब पाटील महामंडळाची उद्योजकता क्रांती
Total Views: 89