बातम्या

मुंबईतच घर देऊन त्याची योजना जाहीर करा : कॉ. उदय भट

Announce the plan to provide a house in Mumbai Com Uday Bhat


By Administrator - 7/3/2026 11:16:06 AM
Share This News:



मुंबईतच घर देऊन त्याची योजना जाहीर करा : कॉ. उदय भट

आजऱ्यात किसान भवन येथे गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न


आजरा(हसन तकीलदार) :- मुंबईतच घरे देण्याचे शासनाने मान्य केले असून आज उद्या करत गिरणी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. येत्या अधिवेशनात शासनाला जाब विचारण्यासाठी १० मार्च रोजी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करून सरकारने मुंबई घरे दाखविण्याचा कार्यक्रम करून मुंबईतच घरे देऊन त्याची योजना जाहीर करावी असा इशारा कॉ. उदय भट यांनी दिला. आजरा येथे किसान भवनाच्या सभागृहामध्ये झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

स्वागत कॉ. संजय घाटगे यांनी केले. प्रास्ताविक नारायण भडांगे यांनी केले. यावेळी बोलताना भट म्हणाले, शासनाकडे अदानी व अंबानी यांना देण्यासाठी प्रचंड जागा आहे. परंतू गिरणी कामगारांनी स्वतःचे रक्त आठवून मुंबईला जागतिक दर्जा दिला. त्यातील गिरणी व्यवसाय बंद करून गिरणी कामगारांना देशोधडीला लावले. संघटनेच्या मागणीप्रमाणे गिरणीच्या जागेतच गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याची मागणी मान्य केले असून ती घरे दाखविण्याचा कृती कार्यक्रम शासनाने जाहीर करावा यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगितले.

यावेळी अतुल दिघे यांनी निवडणूका तोंडावर आल्यानंतर गिरणी कामगारांची आठवण येते, पण प्रत्यक्ष मागणीच्यावेळी पालकमंत्री दुर्लक्ष करतात. हे बरोबर नाही. मुंबईमधील एकूण १४ संघटना एकसंघ झाल्याने गिरणी कामगारांना मुंबईतच घरे दिली पाहिजेत. तसेच गिरणी कामगार हे पेन्शनर व शेतकरी आहेत. त्यासाठी त्यांची पेन्शनवाढ व शेतीच्या नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे यासाठीही लढण्याची तयारी ठेवावी तसेच गिरणी कामगारांच्या वारसांचा पाठिंबा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. शांताराम पाटील यांनी आजऱ्यातील गिरणी कामगार हा लढवय्या व चळवळीतील असून आजऱ्यातील गिरणी कामगारांनी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. धोडिंबा कुंभार, कॉ. शिवाजी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विठ्ठल बामणे, नारायण राणे, हिंदूराव कांबळे, दौलती राणे, निवृत्ती मिसाळ, मारूती पाटील, अनिता बागवे, राजश्री कुंभार, शांता राणे यांच्यासह गिरणी कामगार, पेन्शनर, महिला उपस्थित होत्या. काशिनाथ मोरे यांनी आभार मानले.


मुंबईतच घर देऊन त्याची योजना जाहीर करा : कॉ. उदय भट
Total Views: 129