बातम्या
"राजे विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा"
By nisha patil - 7/30/2025 3:06:59 PM
Share This News:
"राजे विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा"
कागल, प्रतिनिधी: शिक्षण व समाजकारण क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या "राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार" यंदा जाहीर झाले आहेत.
या वर्षी कमल पाटील (आरदाळ), बाजीराव ढोले, शहाजी पाटील (दोघेही गोरंबे), दिनकर प्रभावळकर, शंकर बाबर (दोघेही कागल), शिवाजीराव धुरे (उत्तूर), रंगराव तोरस्कर (नागाव) यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून, अनिल सारंग (सिद्धनेर्ली) यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शाहू उद्योग समूहाचे संस्थापक, सहकार क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्व दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदितादेवी घाटगे यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाची संकल्पना श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांची आहे.
यंदा कागल, करवीर, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील एकूण ६९ शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये प्राथमिक विभागातील २९, माध्यमिक विभागातील ३०, जीवन गौरव पुरस्कारासाठी ८ व शिक्षकेत्तर सेवेतील २ शिक्षकांचा समावेश आहे.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि कोल्हापुरी फेटा असे असून, शिक्षकांचा सहपत्नीक/सहपती सत्कार समारंभपूर्वक केला जाणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती पुरस्कारप्राप्त शिक्षकांना स्वतंत्रपणे दिली जाईल.
"राजे विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा"
|