विशेष बातम्या
“आग कोणी लावली याचं उत्तर द्या!” – केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणात रंगकर्म्यांचा संताप;
By nisha patil - 8/11/2025 3:45:35 PM
Share This News:
“आग कोणी लावली याचं उत्तर द्या!” – केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणात रंगकर्म्यांचा संताप;
खासदार शाहू महाराजांची तातडीची बैठक
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाचा वेग संथ असल्याने आणि अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याने रंगकर्मींकडून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज यांनी शुक्रवारी अधिकारी, अभियंते, आर्किटेक्ट, ठेकेदार आणि रंगकर्मी यांची तातडीची संयुक्त बैठक बोलावली.
बैठकीदरम्यान सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर खासदार शाहू महाराजांनी स्पष्ट सूचना दिल्या की, नाट्यगृहाच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड होऊ नये आणि हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण झालेच पाहिजे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कामासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले.
8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले होते. कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनर्बांधणीसाठी पहिल्यांदा 10 कोटी, नंतर आणखी 25 कोटी रुपये दिले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या कामास सुरुवात झाली असून, ते चार टप्प्यांत सुरू असल्याचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली.
बैठकीदरम्यान आर्किटेक्ट रविकिशोर माने आणि संदीप घाटगे यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले. त्यावर ठेकेदार आणि सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींनी समर्पक उत्तरे दिली. व्ही. बी. पाटील आणि आर. के. पोवार यांनीही काही तांत्रिक शंका मांडल्या. रंगकर्मींच्या वतीने आनंद काळे यांनी नाट्यगृहाचे काम दर्जेदार आणि गतिमान होणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला.
यावेळी अॅड. बाबा इंदूलकर यांनी तीव्र शब्दात सवाल केला – “नाट्यगृहाला आग कोणी लावली, या प्रश्नाचं उत्तर का दिलं जात नाही?” या प्रश्नावर अभियंत्यांनी सांगितले की, पोलिस तपास सुरू असून, चौकशीनंतरच सत्य समोर येईल. दिलीप देसाई यांनी गॅलरीची उंची दोन फुटांनी कमी करण्याचे कारण विचारले असता सल्लागार कंपनीने स्पष्ट केले की गॅलरी केवळ पाच इंचांनी कमी करण्यात आली असून, त्यामुळे कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही.
या बैठकीस विजय देवणे, बाबा पार्टे, महादेवराव आडगुळे, बाळ पाटणकर, दिलीप पवार, अमरजा निंबाळकर यांसह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापुरातील या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा वेग आणि दर्जा हेच आता शहराच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.
“आग कोणी लावली याचं उत्तर द्या!” – केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणात रंगकर्म्यांचा संताप;
|