बातम्या

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Anti witchcraft law should be implemented effectively


By nisha patil - 11/28/2025 4:17:47 PM
Share This News:



जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश

कोल्हापूर, दि. २८ : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीतून सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह आरोग्य, शिक्षण, जिल्हा माहिती कार्यालय, महिला व बालविकास, पोलीस, माविम विभागाचे प्रमुख तथा समिती सदस्य उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना व तक्रारींबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच पोलीस विभागाने दोन प्रकरणांमध्ये केलेल्या जलद तपासाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विभागाचे अभिनंदनही केले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, श्रद्ध-अंधश्रद्धांमधील फरकांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत जादूटोणा विरोधी कायद्याचा धाक अनिष्ट कृत्य करणाऱ्या लोकांना समजण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अघोरी कृत्यातून जिल्ह्यात होणाऱ्या घटना कोल्हापूरसाठी भूषणावह नाहीत. यासाठी एक महिन्याची विशेष जनजागृती मोहीम राबवून थेट कारवाई मोहीम हाती घ्या. घटना घडल्यानंतर कारवाईपेक्षा, अगोदरच गावागावांमध्ये अशा घटना रोखल्या पाहिजेत.

गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवकांना याबाबत पत्र देऊन अशा घटनांची माहिती पोलीस विभागाला तातडीने कळविणेसाठी सांगा. तसेच प्रत्येक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी व गावातील ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये पोस्टर लावून माहिती व तक्रार देण्यासाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करा. याबाबत माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस व नाव गोपनीय राहील हेही कळवा. घटना घडत असतानाच अशा वेळी पोलीसांनी कडक कारवाई करावी. गुन्हे नोंदविल्याबाबत प्रसिद्धी करावी. तसेच समितीमधील सदस्यांनी आपापल्या विभागांमार्फत जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना माहिती द्यावी. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्येही याबाबत माहिती देऊन, त्यांच्यामार्फत घरोघरी संदेश देण्यात यावा. तसेच या बैठकीतून इतर विभागांमधील काही सदस्य घेण्याबाबत व अशासकीय सदस्यांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.


जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 19