बातम्या

पर्यावरण संतुलनासाठी उपभोग कमी करावा अनुप जयपूरकर ः विद्यापीठात पर्यावरणभान व पत्रकारिता विषयावर कार्यशाळा

Anup Jaipurkar


By nisha patil - 8/10/2025 6:03:22 PM
Share This News:



पर्यावरण संतुलनासाठी उपभोग कमी करावा अनुप जयपूरकर ः विद्यापीठात पर्यावरणभान व पत्रकारिता विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर ः प्रतिनिधी पर्यावरणाचे प्रश्न गंभीर होण्यास मानवाच्या उपभोगाच्या सवयी कारणीभूत ठरत असून मानवाने उपभोगाचे प्रमाण कमी केल्यास पर्यावरणाचे संतुलन होण्यास मदत होईल, असे मत पुणे येथील पर्यावरण प्रश्नांचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार अनुप जयपूरकर यांनी व्यक्त केले.
 

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स आणि लक्ष्मी मल्टिपर्पज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणभान आणि पत्रकारिता या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे जनरल मॅनेजर हरिष सायवे, लक्ष्मी मल्टिपर्पज फौंडेशनचे विनायक देसाई, पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर आणि अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते.
 

जयपूरकर म्हणाले, विकास आणि प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे. जंगलतोड, शहरीकरण आदींमुळे वातावरणातील बदलासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. अलिकडेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतीयोग्य माती वाहून गेली.

या परिसरात नजीकच्या काळात पुरेशी शेती पिकू शकणार नाही, हा अत्यंत गंभीर धोका आहे. माणूस उपभोगजन्य बनत असून दिवसेंदिवस तो अघोरी पद्धतीने निसर्गाचा उपभोग होत आहे. यातून पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची तीव्रता कमी करायची असेल तर माणसांनी सवयी बदलून निसर्गपूरक सवयींचा अंगिकार केला पाहिजे.
 

दुसर्‍या सत्रात पाणी प्रश्नाचे अभ्यासक संदीप चोडणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. नदी स्वच्छ राखली तर नदीच्या परिसरातील जीवसृष्टी आणि जैवविविधता समृद्ध राहील. मानवाच्या अस्तित्त्वासाठी नदी आणि पाण्याची शुद्धता आवश्यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी साक्षरता राबवली पाहिजे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी पर्यावरणीय प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, पाणी, हवा, ध्वनी आदींच्या प्रदूषणाची चर्चा होते. परंतु जंगलातील प्रदूषणाची तितकीशी चर्चा होत नाही. देशातील जंगलेच प्रदूषणामुळे धोक्यात असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सानिका पाटील हिने केला. सूत्रसंचालन समृद्धी मोदक हिने तर आभार जिजा जाधव हिने मानले.

 


पर्यावरण संतुलनासाठी उपभोग कमी करावा अनुप जयपूरकर ः विद्यापीठात पर्यावरणभान व पत्रकारिता विषयावर कार्यशाळा
Total Views: 60