बातम्या

गणेश विसर्जनात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन

Appeal to maintain a safe distance


By nisha patil - 9/24/2026 7:21:17 PM
Share This News:



गणेश विसर्जनात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यात 125 पथके मिरवणुक मार्गावर तैनात

पथकांसोबत अतिरिक्त रोहित्रांचीही व्यवस्था

कोल्हापूर दि. 24 सप्टेंबर 2026 : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सुरक्षितपणे पार पडावी, या हेतूने भक्तांच्या विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरवणूक मार्गावर महावितरणकडुन आवश्यक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. मिरवणूक मार्गावर अभियंता व जनमित्र यांची कोल्हापूर जिल्ह्यात 125 पथके तैनात करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पथकांसोबत अतिरिक्त रोहीत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी गणेशमंडळांनी विसर्जन प्रसंगी विद्युत सुरक्षेबाबत दक्षता बाळगावी, असे महावितरणने आवाहन केले आहे.

            मंडळांनी मिरवणूकीत अधिक उंचीच्या गणेश मूर्ती, झेंडे व साऊंड सिस्टिम याबाबत विशेष दक्षता घ्यावी. त्याकरिता ठिकठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या विद्युत वाहिन्यांची उंची निकषानुसार वाढविण्यात आली आहे. शक्य त्या ठिकाणी एरियल बंच केबल वा भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनी वीज वाहीन्या, वीज खांब, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे.

मिरवणूकीतील देखाव्यांचा विद्युत यंत्रणेला स्पर्श होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. सुरक्षेच्या कारणास्तव विजेच्या तारा स्वत:हून हाताळण्याचा प्रयत्न करु नये.  मिरवणूक दरम्यान विद्युत उपकरणांसाठी अनाधिकृतपणे विजेचा वापर करणे टाळावे. असे प्रकार जीवावर बेतू शकतात. गणेशमंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

            महावितरणकडून मिरवणुक मार्गावर व विसर्जनाचे ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मिरवणूक मार्ग भागातील वीज पुरवठा खंडित ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे नागरीकांनी व वीज ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे. मंडळ कार्यकर्त्यांनी आपात्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कोल्हापूर (7875769103) कक्षाशी संपर्क साधावा. 


गणेश विसर्जनात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन
Total Views: 28