विशेष बातम्या
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ३१ पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती; पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप
By nisha patil - 8/5/2025 12:38:44 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ३१ पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती; पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप
कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना दिवंगत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाने लागू केलेल्या अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत ३१ पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली.
या उमेदवारांना नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात मा. श्री. प्रकाश आबीटकर, पालकमंत्री कोल्हापूर व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत कार्यवाही
शासन निर्णय दिनांक 26.10.1994 नुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रिया राबवली जाते. जिल्हा परिषदेने डिसेंबर 2024 अखेर कागदपत्रे पूर्ण असलेल्या उमेदवारांची सेवा जेष्ठता यादी तयार करून पात्रतेनुसार निवड केली होती. सध्या ३१ उमेदवार शैक्षणिक पात्रता, जातप्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह नियुक्तीसाठी पात्र ठरले.
पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन
नियुक्ती आदेश प्रदान करताना मा. पालकमंत्री यांनी नविन नियुक्त उमेदवारांना मार्गदर्शन करत सांगितले की, "स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हजारो उमेदवार प्रयत्न करत असताना, तुम्हाला ही संधी तुमच्या पालकांच्या सेवेस आणि शासनाच्या निर्णयामुळे मिळाली आहे. त्यामुळे ही संधी जबाबदारीने स्वीकारा व जनतेच्या सेवेत निष्ठेने कार्य करा."
जिल्हा परिषदेचे अभिनंदन
या यशस्वी उपक्रमाबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) व संपूर्ण प्रशासनिक पथकाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अधिकारी, अनुकंपा नियुक्ती लाभार्थी उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या आभारप्रदर्शनाने करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ३१ पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती; पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप
|