विशेष बातम्या

कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता

Approval in principle to start


By nisha patil - 12/13/2025 6:03:15 PM
Share This News:



कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अतारांकित प्रश्नाला उत्तर

नागपूर, दि. १२ : कोल्हापूर येथे निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, या प्रबोधिनीमध्ये ३० प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना मंत्री कोकाटे यांनी ही माहिती दिली.

आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात नमूद केले होते की, जुलै १९९६ मध्ये राज्य शासनाने कोल्हापूर येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती व फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली होती. मात्र काही वर्षांनंतर फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. यामुळे कोल्हापूरमधील स्थानिक फुटबॉलपटूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. देशात तिसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षक वर्ग असलेल्या आणि हजारो नोंदणीकृत खेळाडूंचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये हे निवासी फुटबॉल केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.

यावर उत्तर देताना मंत्री कोकाटे यांनी सांगितले की, शासन निर्णय दि. १८ नोव्हेंबर १९९५ अन्वये सन १९९६–९७ पासून शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे कुस्ती, शूटिंग व फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली होती. मात्र सुयोग्य निवासी सुविधा व नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान उपलब्ध नसल्याने सन २००० मध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुणे येथे स्थलांतरित करण्यात आले.

दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय धोरण समितीच्या बैठकीत कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रबोधिनीसाठी सुयोग्य निवासी व्यवस्था, भोजन, शिक्षण सुविधा तसेच नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान आवश्यक असून, यासाठी स्थानिक पातळीवर कराराद्वारे सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा कार्यान्वित करण्यात येईल, असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे

 


कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता
Total Views: 7