बातम्या
२९ लाखांची थकबाकी अन् महापालिकेचा दणका! साठमारीतील ८ गाळ्यांना सील
By nisha patil - 11/19/2026 3:17:53 PM
Share This News:
२९ लाखांची थकबाकी अन् महापालिकेचा दणका! साठमारीतील ८ गाळ्यांना सील
घरफाळ्याची थकबाकी वसूल करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोखले कॉलेजजवळील साठमारी परिसरात तब्बल २९ लाख १५ हजार ३३ रुपयांची घरफाळा थकबाकी न भरल्याने आठ गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. घरफाळा विभागीय कार्यालय क्रमांक १, गांधी मैदान आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने साठमारी परिसरातील सर्व्हे क्रमांक २६१२ मधील शेड मालक राजाराम गोविंद नाईक यांच्या आठ गाळ्यांना सील ठोकले.
संबंधित शेड मालकाकडे २९ लाख १५ हजार ३३ रुपयांची घरफाळा थकबाकी होती. वारंवार थकबाकी वसुलीच्या प्रयत्नांनंतरही रक्कम जमा न झाल्याने महापालिकेने ही कठोर कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त परितोष कंकाळ आणि सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, विभागातील सर्व लिपिक तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते.
२९ लाखांची थकबाकी अन् महापालिकेचा दणका! साठमारीतील ८ गाळ्यांना सील
|