बातम्या
*आजऱ्यात मंगलमय, उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या घरगुती बाप्पाचे आगमन
By nisha patil - 9/14/2026 8:55:44 PM
Share This News:
*आजऱ्यात मंगलमय, उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या घरगुती बाप्पाचे आगमन
*आजरा(हसन तकीलदार):-आज दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी आजरा शहर व संपूर्ण तालुक्यात घरगुती बाप्पाचे अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात आगमन झाले. "गणपती बाप्पा मोरया"च्या गजराने आजऱ्याचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भक्तीगीतांच्या आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात भक्तांनी वाहनातून तर कोणी डोक्यावरून बाप्पाला आणले.
आज पहाटेपासूनच आजरा मुख्यबाजारपेठ, संभाजी चौक, सुभाषचौक तसेच कुंभारगल्ली परिसरात गणेशमूर्ती नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बच्चे कंपनीचा तर उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील बहुतांशी घरगुती गणपतीचे आगमन दुपारपर्यंत पारंपारिक वाद्याच्या गजरात भक्तीभावात झाले. आजच्या शुभमुहूर्तावर घरोघरी परंपारिक पद्धतीने आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पूजेसाठी लागणारे साहित्य जसे दुर्वा, जास्वंदीची फुले, केळीची मोने, विविध फळानी बाजारपेठ सजली होती. बाप्पा विराजमान झाल्यानंतर महिलांनी मनोभावे आरती केली आणि लाडक्या गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवला. अनेक सुजाण नागरिकांनी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्याचे दिसत होते. कापडी, कागदी आणि नैसर्गिक फुलांच्या साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे.
उत्सवाच्या काळात शहरात कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये त्याचप्रमाणे शांतता सुव्यवस्था राखली जावी यासाठी आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वात मुख्य बाजारपेठ आणि चौकाचौकात अगदी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
*आजऱ्यात मंगलमय, उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या घरगुती बाप्पाचे आगमन
|