बातम्या
प्रशिक्षणामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देणे शक्य – अरविंद भादिकर
By nisha patil - 12/6/2026 8:47:01 PM
Share This News:
*प्रशिक्षणामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देणे शक्य – अरविंद भादिकर*
*रत्नाकर मोहिते व विश्वजीत भोसले यांचा विशेष सत्कार*
*कोल्हापूर, दि.१२ जून २०२६ :* महावितरणसारख्या तांत्रिक यंत्रणेत काम करताना प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. प्रशिक्षणामुळे काळासोबत राहून ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देणे शक्य होते.
यामुळेच महावितरण लाईनमन ते मुख्य अभियंता यांचे नियमित प्रशिक्षण जिल्हा, प्रादेशिक व राज्य स्तरावर आयोजित करत असते, असे प्रतिपादन महावितरणच्या राज्यातील मुख्य प्रशिक्षण केंद्र ‘एकलहरे’ नाशिकचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांनी केले.
कोल्हापूर परिमंडलाच्या ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील लघु प्रशिक्षण केंद्रात अरविंद भादिकर यांनी परिमंडलातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, ‘एकलहरे’प्रशिक्षण केंद्राच्या सहाय्यक महाव्यवस्थापक(मानव संसाधन) दीप्ती आंबेकर-माळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरविंद भादिकर पुढे म्हणाले, ‘कोल्हापूर परिमंडलाने कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथील ग्राहक प्रामाणिक आहे. कर्मचाऱ्यांनी शुद्ध व सकारात्मक हेतूने काम केल्यास कामाचा आनंद घेता येतो. ग्राहकास नाही म्हणण्याऐवजी त्यांची कामे नियमात बसवून करून देण्यात अधिकाऱ्याची खरी कसोटी असते. वीज यंत्रणेवर काम करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा आवर्जून वापर करावा. ग्राहकांना वीज अपघातांबद्दल अधिक जागरूक करा.’
यावेळी कोल्हापूर लघुप्रशिक्षण केंद्राने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपकार्यकारी अभियंता तथा केंद्राचे समन्वयक रत्नाकर मोहिते व ‘ग्राहक सेवा व संवाद कौशल्य’ या महत्वपूर्ण विषयावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांचा मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी सर्वाना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास कार्यकारी अभियंते सुनील गवळी, म्हसू मिसाळ, अभिजीत सिकनीस, सागर मारुळकर, अजित अस्वले, नाशिक प्रशिक्षण केंद्राचे उप कार्यकारी अभियंता भूपेंद्र गांगुर्डे व महावितरण अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देणे शक्य – अरविंद भादिकर
|